कोथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:11 AM2021-08-25T04:11:16+5:302021-08-25T04:11:16+5:30
नागपूर : घाऊक बाजारात भाज्यांचे भाव स्वस्त असले तरीही किरकोळमध्ये गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या विकताना ...
नागपूर : घाऊक बाजारात भाज्यांचे भाव स्वस्त असले तरीही किरकोळमध्ये गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या विकताना शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. याकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. कोथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन, अशी शेतकरी व ग्राहकांची व्यथा आहे.
लागवडीसाठी गुंतवणूक वाढल्यानंतरही भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. याशिवाय डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचे दरही वाढले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीरचा भाव प्रति किलो ६० रुपये असला तरीही शेतकऱ्यांच्या हातात २० रुपये येतात. याचप्रमाणे सोमवारी शेतकऱ्यांनी वांगे ६ ते ८ रुपये, टोमॅटो ८ रुपये, हिरवी मिरची १५ रुपये किलो विकली. त्यातुलनेत किरकोळमध्ये ग्राहकांना वांगे २० रुपये, टोमॅटो ३० रुपये आणि हिरवी मिरची ४० रुपये भावात खरेदी करावी लागली. शेतकऱ्यांच्या भावात आणि किरकोळमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या भावात मोठी तफावत दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते.
कोणत्या भाजीला काय भाव (प्रति किलो रुपये)
भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव
वांगी८ २०
टोमॅटो८ ३०
भेंडी १५ ४०
चवळी १५ ४०
पालक५ २०
कोथिंबीर ३० ६०
मेथी २५ ६०
हिरवी मिरची १५ ४०
पत्ताकोबी १५ ४०
फुलकोबी २५ ५०
दोडके १० ३०
कारले २० ५०
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना :
गेल्या काही वर्षांपासून भाज्यांच्या लागवडीची गुंतवणूक वाढली आहे. तसेच वाहतुकीचे दरही वाढले आहेत. त्यानंतरही भाव पूर्वीचेच मिळत आहेत. भाव पडल्यानंतर अनेकदा लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे भाज्या तोडून शेतातच फेकून देतो.
केशव आंबटकर, शेतकरी.
राज्य सरकारने भाज्यांचे भाव ठरवून द्यावे. त्यानुसार व्यापारी खरेदी करतील आणि शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही. या मागणीवर सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही. पीक जास्त आल्यानंतर टोमॅटो, वांगे, पालक ठोक बाजारात नेण्यासाठी परवडत नाहीत.
उल्हास ठाकरे, शेतकरी.
ग्राहकांना परवडेना :
शेतकऱ्यांचे भाव, ठोक बाजारातील भाव आणि किरकोळमध्ये ग्राहकांना खरेदी कराव्या लागणाऱ्या भाज्यांच्या भावात मोठी तफावत असते. ग्राहकांना तिपटीच्या भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात. भाज्या स्वस्त झाल्याच्या बातम्या नेहमीच खोट्या ठरतात.
प्रशांत शिवणकर, ग्राहक.
अनेक वर्षांपासून भाज्या जास्त भावातच खरेदी कराव्या लागतात. ९० टक्के ग्राहक किरकोळमधूनच भाज्या खरेदी करतात. त्यांचे महिन्याचे बजेट ठरले असते. कधी कधीच भाज्या कमी भावात मिळण्याचा अनुभव येतो. किरकोळमध्ये दुप्पट, तिपटीत भाज्यांची विक्री होते.
संजय शिरोड, ग्राहक.
घाऊक बाजारात प्रत्येक दिवशी आवकीनुसार भाज्यांचे भाव ठरतात. कमी आवक राहिली तर जास्त भाव आणि कमी असली तर शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो. व्यापारी वा अडतिये शेतकऱ्यांकडून रोखीने माल खरेदी करतात. त्यावर थोडा फार नफा कमवून ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतात. किरकोळ विक्रेते कोणत्या भावात विक्री करतात, याच्याशी आमचा संबंध नाही. भावात दरदिवशी फरक असतोच.
नंदकिशोर गौर, अध्यक्ष, कळमना भाजी मार्केट.