वृद्धासह पाच जणांनी लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:45+5:302021-08-18T04:12:45+5:30
दत्तवाडीच्या गजानन सोसायटीत राहणारे मोहन हिरालाल श्रीरसवार (वय ७३) यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावून घेतला. त्यांना घरच्यांनी खासगी ...
दत्तवाडीच्या गजानन सोसायटीत राहणारे मोहन हिरालाल श्रीरसवार (वय ७३) यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावून घेतला. त्यांना घरच्यांनी खासगी इस्पितळात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. शांतनु प्रदीप ठवरे (वय २२) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. इंदोऱ्यातील लघुवेतन कॉलनीत राहणारे संदीप द्वारकादास नंदेश्वर (वय ३६) यांनी गळफास लावून घेतला. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. स्वाती संदीप नंदेश्वर (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
वाघधरा नवीन गुमगाव (हिंगणा) येथील विनोद सुखदेव कांबळे (वय ४०) यांनी सोमवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. शीला विनोद कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. चिंचभुवनमधील कुलकर्णी अपार्टमेंटमध्ये राहणारे पंकज रमेश आमले (वय ३५) यांनी सोमवारी दुपारी गळफास लावून घेतला. त्यांना घरच्यांनी मेडिकलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी आमलेंना मृत घोषित केले. बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अशाच प्रकारे भंते आनंद काैशल्यानगर (कपिलनगर)मधील रहिवासी सतीश रमेश पाटील (वय ३८) यांनी सोमवारी रात्री गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. चंदा रमेश पाटील (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.