नागपूरमध्ये मुन्ना यादव-मंगल यादव गटात जबर हाणामारी, पाच जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 01:57 PM2017-10-22T13:57:35+5:302017-10-22T13:58:27+5:30

फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर अजनीतील दोन गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला.

Five people injured in Munna Yadav-Mangal Yadav clash in Nagpur | नागपूरमध्ये मुन्ना यादव-मंगल यादव गटात जबर हाणामारी, पाच जण जखमी 

नागपूरमध्ये मुन्ना यादव-मंगल यादव गटात जबर हाणामारी, पाच जण जखमी 

Next

नागपूर - फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर अजनीतील दोन गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. त्यामुळे दोन्ही गटातील  सात जण जबर जखमी झाले. शनिवारी रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान झालेल्या या घटनेमुळे अजनीच्या चुनाभट्टी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 

वर्धा मार्गावरील अजनी चौकाजवळ चुना भट्टी परिसर आहे. या भागात उर्वरित राज्य कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव राहतात. त्यांच्या जुन्या घराच्या बाजूलाच मंगल यादव राहतात. ते एकमेकांचे नातेवाईक असले तरी त्यांच्यात अनेक दिवसांपासून पटत नाही. आज मुन्ना यादव आणि त्यांच्या नातेवाईकांसह जुन्या घरी दिवाळी साजरी करायला गेले होते. 

भाऊबीजेच्या निमित्ताने मुन्ना यांच्या नात्यातील मुलांनी फटाके फोडायला सुरुवात केली. त्याला मंगल यादवच्या गटातील मुलांनी विरोध केला. मुलांची बाचाबाची सुरू झाल्याने आरडाओरडही वाढली. त्यामुळे मुन्ना यादव यांचा मुलगा करण आणि अर्जुन बाहेर आले असता मंगल यादवच्या गटातील मुलांनी त्यांच्यावर हल्ला केला. करण आणि अर्जुनच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यानंतर मुन्ना यादव यांच्या गटातील मुले धावली. त्यानंतर जोरदार हाणामारी सुरू झाली. 

मंगल यादव, पापा यादव आणि त्यांचे १० ते १२ साथीदार या हाणामारीत सहभागी झाल्याचे पाहून मुन्ना यादव यांच्या गटातील मंडळींनी त्यांना प्रत्युत्तर दिले. एकमेकांना जबर मारहाण केल्यामुळे कुणाचे डोके फुटले तर कुणाचा दात तुटला. नगरसेविका लक्ष्मी यादव या मध्यस्थी करायला गेल्या असता त्यांनाही काही आरोपींनी अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे प्रकरण चिघळले. घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. माहिती कळताच मोठा पोलीस ताफा पोहचला. त्यानंतर धंतोली ठाण्यातही मोठ्या प्रमाणात दोन्ही गटातील मंडळींनी धाव घेतली. 

एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरू झाले. दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदविण्यात आल्या. वृत्त लिहिस्तोवर जखमींची नावे उघड झाली नसली तरी तिघांवर खासगी तर चौघांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. धंतोली पोलिसांकडून यासंबंधाने अधिकृत माहिती मिळाली नाही.

पोलीस ठाण्यावर जमाव
सूत्रांच्या माहितीनुसार, या हाणामारीत मंगल यादवच्या गटातील एकाचे दात पडले. जबर दुखापत झाल्यामुळे करण आणि अर्जुन यादव या दोघांना धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  धंतोली पोलीस ठाण्यावर जमावाची मोठी गर्दी होती. त्यात महिलांची संख्या मोठी होती.  मात्र, वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता. 

Web Title: Five people injured in Munna Yadav-Mangal Yadav clash in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.