तीन अरेबियनांसह पाच जणांवर गुन्हा दाखल : सक्करदऱ्यातील प्रकरण
By admin | Published: May 7, 2017 02:31 AM2017-05-07T02:31:32+5:302017-05-07T02:31:32+5:30
नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची सौदी अरेबियात विक्री केल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची सौदी अरेबियात विक्री केल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी तीन अरेबियन नागरिकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ताजाबाद परिसरातील एका ४० वर्षीय महिलेला मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सौदी अरेबियात विकण्यात आले होते. बोरगाव येथील अकिला नामक महिलेने तिला प्रारंभी मुंबईला नेले. तेथे अब्दुला नामक दलालाने व्हीजा आणि तिकीट बनवून दिल्यानंतर ९ सप्टेंबर २०१६ ला तिला दुबईत पाठविण्यात आले. तेथे एका हॉटेलमध्ये आसमा, खालिद आणि मुजाहिद नामक तिघे तिच्याकडून काम करवून घेऊ लागले.महिन्याभरानंतर तिने वेतन मागितले असता तुला आम्ही दोन लाखात विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. तिने मायदेशी परत जाण्यासाठी तगादा लावला असता आरोपी तिला मारहाण करू लागले. एक दिवस संधी साधून ती तेथील पोलिसांकडे पोहचली. त्यानंतर तिला भारतीय दूतावासाच्या माध्यमातून भारतात पाठविण्यात आले. १२ जानेवारी २०१७ ला तिने नागपुरात पोहचून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी बरीच टाळाटाळ केल्यानंतर दोन दलाल आणि तीन अरेबियन अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.