दरोडा टाकण्यापूर्वीच पाच दरोडेखोरांना अटक, २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By दयानंद पाईकराव | Published: January 2, 2024 04:49 PM2024-01-02T16:49:26+5:302024-01-02T16:49:48+5:30
पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून २ लाख २२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना यशोधरानगर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून २ लाख २२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राहिल शेख शब्बीर शेख (वय १९, रा. कब्रस्तानजवळ, यषोधरानगर), यश मनोज दारोकर (वय १९, रा. वनदेवी नगर झोपडपट्टी), असलम उर्फ आसु अब्दुल शरीफ खान (वय २०, रा. दारूल तव्वा मस्जिदजवळ, यशोधरानगर), तौसीफ अंसारी नवाब अंसारी (वय २०, रा. हमीदनगर, कब्रस्तानजवळ) आणि शहिद अंसारी शेख अंसारी (वय १९, रा. वनदेवीनगर झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमवारी १ जानेवारीला रात्री १.३० वाजता यशोधरानगर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकता कॉलनीला लागून असलेल्या मेदानात दडून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकून आरोपींना रंगेहात अटक केली.
आरोपींच्या ताब्यातून एक तलवार, एक लोखंडी चाकु, एक लोखंडी रा ॅड, लोखंडी हातोडी, लाकडी दांडा, मिरची पावडर, दोरी तसेच चार मोबाईल, अॅक्टीव्हा गाडी, एक हिरो होंडा स्प्लेंडर गाडी असा एकुण २ लाख २२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कलम ३९९, ४०२, सहकलम ४, २५, १३५ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.