मोरभवन व गणेशपेठ येथे साकारणार पंचतारांकीत बसस्थानक

By आनंद डेकाटे | Updated: April 5, 2025 18:34 IST2025-04-05T18:31:51+5:302025-04-05T18:34:13+5:30

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : शहरात सहा ठिकाणी होणार व्यापारी संकुल

Five-star bus stands to be built at Morbhavan and Ganeshpeth | मोरभवन व गणेशपेठ येथे साकारणार पंचतारांकीत बसस्थानक

Five-star bus stands to be built at Morbhavan and Ganeshpeth

आनंद डेकाटे, नागपूर 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विकासाच्या प्रतिक्षेत असलेले मोरभवन व गणेशपेठ येथील बसस्थानक आता प्रगत स्वरुपात प्रवाशांच्या भेटीला येणार असून ही दोन्ही स्थानके अद्ययावत सुविधांसह पंचतारांकित दर्जाप्रमाणे साकारावेत यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या दोन्ही प्रकल्पासह नागपूर महानगरातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या जागेवर सहा ठिकाणी विविध व्यावसायिकांना नव्या संधी देणारे व्यापक व्यापारी संकुल साकारणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत विकासकामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नियोजन भवन येथे शनिवारी आयोजित बैठकीत विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला. या बैठकीस महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, वसुमना पंत, वैष्णवी बी., उपायुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता लीना उपाध्याय, नगररचना विभागाचे ऋतुराज जाधव, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे उपस्थित होते.

नागपूर महानगराचा वाढणारा विस्तार लक्षात घेता प्रत्येक भागात व्यावसायिकांना नविन संधी मिळाव्यात यादृष्टीने शासनाने मोकळ्या जागेचा विकास करताना त्याठिकाणी आदर्श व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीने नागपूर येथील संत्रा मार्केट, नेताजी मार्केट, दही बाजार, इतवारी मार्केट, फुल मार्केट, डीग डिस्पेंसरी धरमपेठ आदी ठिकाणी नूतनीकरणाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी आपसात समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नूतनीकरण करण्यात येणाऱ्या परिसरात नागरिकांसाठी परिपूर्ण सुविधांचा समावेश असावा, असे त्यांनी सांगितले.

कोराडी नाका परिसरात साकारणार मध्यवर्ती कारागृह
कोराडी नाका परिसरात साकारणाऱ्या मध्यवर्ती कारागृहाच्या निर्मितीबाबत या बैठकीत व्यापक आढावा घेण्यात आला. येथील कारागृह हे न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्देश व शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार परिपूर्ण झाले पाहिजे. बंदीजनांना कौशल्य प्रशिक्षणासह कारागृहातील सुविधा या निकषानुसार परिपूर्ण व्हाव्यात यादृष्टीने नामांकित वास्तुविद्या विशारदांकडून आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या.
सद्यस्थितीत नगर रचना विभाग, एनएमआरडीए, मध्यवर्ती कारागृह यांनी संयुक्तरित्या जागेची पाहणी करून तात्काळ त्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी जिल्हास्तरीय कारागृह समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीसमोर संबंधित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात येईल. या कारागृहाच्या निर्मितीसाठी एनएमआरडीएने कोराडी नाका मार्गावरील जागेचे अवलोकन केले असून दोन हजार कैद्यांची क्षमता असलेले कारागृह तेथे निर्माण करता येणे शक्य असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

लंडन स्ट्रीट येथे साकारणार परफॉर्मिंग आर्ट गॅलरी व कन्वेंशन सेंटर
ऑरेंज सिटी स्टेट प्रकल्पांतर्गत लंडन स्ट्रीटजवळील परफॉर्मिंग आर्ट गॅलरी व कन्वेंशन सेंटरच्या निर्मितीचा आराखडा तात्काळ तयार करण्यात यावा असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण केल्यानंतर हा आराखडा अंतिम करण्यात येईल. मोकळ्या जागेचा उपयोग योग्य व अधिक कलात्मक पद्धतीने करण्यात यावा, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून निविदा प्रक्रियेला लागणारा कालावधी लक्षात घेता या कामाला गती द्यावी, असे सांगितले.

मौजा अजनी, झिंगाबाई टाकळी आणि बडकस चौक येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर होणार विकास प्रकल्प
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मौजा अजनी, झिंगाबाई टाकळी आणि बडकस चौक येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर बचत गटातील महिलांसह इतर व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व जिल्हा परिषदेला उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत निर्माण व्हावे यादृष्टीने या तिनही ठिकाणी विकास प्रकल्प राबविले जाणार आहे. मौजा अजनी येथे ९,७४९ चौ.मी., झिंगाबाई टाकळी येथे २४,४३२ चौ.मी. आणि बडकस चौक महाल येथे ६१२ चौ.मी. जागेवर हे विकास संकुल उभारण्यात येणार आहेत. याबाबतचे नियोजन व प्राथमिक बाबी तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला दिल्या.

शहरातील सर्व अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम
ज्या ठिकाणी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. पुढच्या काळामध्ये नागपूर मधील सर्व सरकारी आणि नजुल जागावर जे अतिक्रमण करण्यात आले आहे आहे त्या सर्व जागा रिक्त करण्याची मोहीम आम्ही घेतो आहे. त्यासाठी योजना तयार करतो आहे.

Web Title: Five-star bus stands to be built at Morbhavan and Ganeshpeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.