थंडीचा कहर, नागपुरात थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 11:33 AM2021-12-22T11:33:04+5:302021-12-22T11:34:04+5:30
नागपुरात विविध ठिकाणी पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या पाचही जणांचा मृत्यू झाला कडाक्याच्या थंडीमुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा घसरून थंडीचा कडाका वाढला आहे. उपराजधानीतही तापमान चांगलेच घसरले असून ही लाट जीवघेणी ठरत आहे. दरम्यान शहरात एकाच दिवसात ५ जण मृतावस्थेत आढळून आले आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे या पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माहितीनुसार, नागपुरातील कपिलनगर, गणेशपेठ आणि सोनेगाव या ठिकाणी तिघांचा मृत्यू झाला आहे. एका ६५ वर्षीय वृद्धाचा फुटपाथवर मृतदेह आढळून आला आहे. तर, एका व्यक्तीचा मृतदेह ट्रकमध्ये आढळून आला आहे. तर एका अनोळखी महिलेचा मृतदेह शोनेगाव परिसरात आढळून आला आहे. या पाचही जणांचा मृत्यू थंडत गारठून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप याला शासकीय यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
गडचिरोली विदर्भात सर्वात थंड : गारठा वाढला
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे उपराजधानीत परत एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. सलग दुसऱ्या दिवशी नागपुरातील पारा ८ अंशांहून खाली होता. मागील २४ तासात शहरातील किमान तापमानात ०.२ अंश सेल्सिअस इतकी घट दिसून आली. मंगळवारी शहरात ७.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून ४.९ अंशांहून खाली होते. विदर्भात गडचिरोली सर्वात थंड होते. तेथे ७.४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.