मेट्रो रेल्वे पाच हजार झाडे लावणार
By admin | Published: June 24, 2016 03:11 AM2016-06-24T03:11:44+5:302016-06-24T03:11:44+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएमआरसीएल) मेट्रो रेल्वे प्रकल्प इको फ्रेंड्ली बनविण्याचा विडा उचलला असून शहरात हिरवळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
एक कोटीचा निधी राखीव : मिहान डेपोमध्ये पार्क उभारणार
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएमआरसीएल) मेट्रो रेल्वे प्रकल्प इको फ्रेंड्ली बनविण्याचा विडा उचलला असून शहरात हिरवळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत अंबाझरी परिसर आणि हिंगणा रोडपर्यंत जवळपास १५ हेक्टर जमिनीवर पाच हजार झाडे लावण्यात येणार आहे.
व्यावसायिक एजन्सीची मदत घेणार
आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेसाठी आतापर्यंत ४५२ झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन आणि शहरातील हिरवळ टिकून ठेवण्याचे काम मेट्रो रेल्वेपुढे आहे. वनीकरणाच्या नियमानुसार एजन्सी १८५० झाले लावणार होती. पण त्यापेक्षा अडीचपट अर्थात पाच हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वनीकरणाचा उपयोग सामान्य नागरिकांना होईल, अशा रितीने मेट्रो रेल्वे एजन्सीकडून नियोजन करण्यात येणार आहे. झाडांच्या सभोवताल वॉकिंग ट्रॅक बनविण्यात येणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांसाठी बेन्चेस आणि छत लावण्यात येणार आहे. तसेच मेट्रो रेल्वे एजन्सी आपल्या मिहान डेपोमध्ये पार्कचा विकास करणार आहे. याशिवाय तलाव खोदून डेपोच्या सभोवताल छोटा नाला तयार करण्यात येईल. त्याठिकाणी वृक्षारोपण करून वॉटर बॉडी तयार करण्यात येणार आहे.
या कामासाठी सृष्टी पर्यावरण मंडळ आणि नेचर लव्हर्स फेलोशिप सोसायटीची मदत घेण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)