नवरात्रीदरम्यान कोराडीत पाच हजार महिला करणार महाआरती - चंद्रशेखर बावनकुळे
By योगेश पांडे | Published: October 10, 2023 05:58 PM2023-10-10T17:58:57+5:302023-10-10T17:59:30+5:30
मागील काही दिवसात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्र व देशाचे रक्षण करण्यासाठी ९ दिवस अविरत यज्ञ सुरू राहणार आहे.
नागपूर : नवरात्रोत्सवादरम्यान कोराडी येथील श्री जगदंबा देवस्थानात यंदा २५ लाखांहून अधिक भाविक दर्शन घेण्याची शक्यता आहे. यंदा अष्टमीच्या दिवशी पाच हजार महिला देवीची महाआरती करतील व सातशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा पुढाकार घेण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मागील काही दिवसात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्र व देशाचे रक्षण करण्यासाठी ९ दिवस अविरत यज्ञ सुरू राहणार आहे. यासोबतच ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानातंर्गत जिल्हाभरातील १० हजार अमृत कलश कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात एकत्र आणले जातील असे बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावरदेखील भाष्य केले. जो वक्ता नाही तो नेता कसा बनू शकेल असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. ते खरे बोलले आहेत, जर वडेट्टीवार यांना अशी शंका असेल तर त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अर्थ काढावा, असा चिमटा भाजपा बावनकुळे यांनी काढला.