नागपूर मेट्रो रेल्वेचा पाच टन वजनी लोखंडी पिलरचा ढाचा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:33 PM2017-11-24T23:33:25+5:302017-11-24T23:36:47+5:30
मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा गलथानपणा पुन्हा एकदा शुक्रवारी पुढे आला. सीताबर्डी मुंजे चौकातील मेट्रो रेल्वेच्या इंटरचेंज चौकात दुपारी ३.३० वाजता पाच टन वजनाचा (१७५ लोखंडी सळाक) लोखंडी पिलरचा ढाचा रस्त्यावर कोसळला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा गलथानपणा पुन्हा एकदा शुक्रवारी पुढे आला. सीताबर्डी मुंजे चौकातील मेट्रो रेल्वेच्या इंटरचेंज चौकात दुपारी ३.३० वाजता पाच टन वजनाचा (१७५ लोखंडी सळाक) लोखंडी पिलरचा ढाचा रस्त्यावर कोसळला. हा रस्ता कामादरम्यान बंद केल्यामुळे सुदैवाने जीवहानी झाली नाही. पण पिलर अचानक कोसळल्यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी मेट्रो रेल्वेविरोधात नारेबाजी करून रोष व्यक्त केला.
बांधकामादरम्यान यापूर्वी घडलेल्या घटनांपासून मेट्रो रेल्वेच्या कंत्राटदाराने बोध घेतलेला नाही. रिच-१ चे काम एनसीएल ही कंत्राटदार कंपनी करीत आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रकल्पाचे काम सुरू असताना हायड्रा मशीनचा धक्का लागल्याने लोखंडी पिलरचा ढाचा कोसळला. तत्पूर्वी लोखंडी ढाचा बॅरिकेट्सवर वाकत असल्याचे दिसून येताच क्रेनच्या साहाय्याने तो धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामुळे ढाचा ५ ते ७ मिनिटात रस्त्यावर झुकला व अचानक कोसळला. सुरक्षेच्या उपाययोजना असल्यामुळे कुठलेही नुकसान वा जीवहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. त्यावेळी पोलीसही घटनास्थळी पोहाचले. खबरदारी म्हणून त्या भागाचा वीज पुरवठा १ तासाकरिता खंडित करण्यात आला तसेच त्या भागातील रस्ता देखील वाहतुकीकरिता बंद करण्यात आला. मेट्रो मार्शल आणि कर्मचायांनी अपघात स्थळी सुरक्षा व्यवस्थेची कमान संभाळली.
क्रेन आणि कटिंग मशीनच्या साहाय्याने झुकलेला लोखंडी ढाचा कापण्यात आला आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या संपूर्ण बचाव कार्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित घटनास्थळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांकडून घेत होते व आवश्यक सूचना देत होते. आ. सुधाकर देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
चौकशीचे आदेश
डॉ. बृजेश दीक्षित यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी दुपारी १०.३० वाजता घटनेचा आढावा आणि निर्देश देण्यासाठी मेट्रो हाऊसमध्ये बैठक बोलविली आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाही, याकरिता त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना आणि निर्देश दिले आहेत.
घटनास्थळी महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-१) देवेंद्र रामटेककर, उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) अखिलेश हळवे, मीडिया सल्लागार सुनील तिवारी व इतर अधिकारी उपस्थित होते.