कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये दिसताहेत पाच प्रकारचे त्वचाविकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:08 AM2021-07-30T04:08:18+5:302021-07-30T04:08:18+5:30
नागपूर : कोरोनापूर्वी आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पाच प्रकारच्या त्वचेचे विकार दिसून आल्याचे मेडिकलच्या एका अभ्यासातून समोर ...
नागपूर : कोरोनापूर्वी आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पाच प्रकारच्या त्वचेचे विकार दिसून आल्याचे मेडिकलच्या एका अभ्यासातून समोर आले आहे. त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या टिपांवर वेदनादायक लाल पुरळ येऊन खाज सुटणे, अंगावर पित्ताच्या गाठी उठणे, नागीण, चिकनपॉक्स-सारखे पुरळ येणे आदी रुग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, यात केस गळणा-या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
‘कोविड-१९’ हा केवळ श्वसनाचा आजार नाही. त्याचा प्रभाव इतरही अवयवांवर पडत असल्याचे आता समोर आले आहे. मेडिकलच्या त्वचारोग विभागाने पुढाकार घेत कोरोना होऊन गेलेल्या व कोरोनाचा संशयित रुग्णांचा अभ्यास हाती घेतला आहे. यात सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांमध्ये त्वचेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये हे विकार अधिक तीव्रतेने आढळून आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-मॅकोलोपाॅप्युलर रॅश
रुग्णाला ताप येऊन त्वचेवर ठिपके उठणे, लाल रंगाची जखम दिसून येऊन खाज सुटणे, त्वचेवरील हे पुरळ कोरोनाचे रुग्णांमध्ये सर्वात सामान्य लक्षण असल्याचे अभ्यासात दिसून आले. डॉक्टरांच्या मते, ही लक्षणे कोरोना संशयित रुग्णांमध्ये आणि कोरोना बरा झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये दिसून येत आहे.
-वेसिक्युलर रॅश
लाल फुगीर पुरळ किंवा चिकन पॉक्स-सारखे दिसून येणा-या पुरळला ‘वेसिक्युलर रॅश’ म्हणून ओळखले जाते. हे अंगावर उठणा-या पित्ताच्या गाठींपेक्षा जास्त तीव्र असतात. कोरोनाच्या संशयित रुग्णांमध्ये प्रमाण जास्त असल्याचे अभ्यासातून समोर आले.
- ‘हर्पिझ झोस्टर’
नागीण या त्वचा विकाराला वैद्यकीय भाषेत ‘हर्पिझ झोस्टर’ म्हटले जाते. पाण्याने भरलेले छोटे-छोटे पुंजक्यासारखे फोड येतात. कोरोना उपचारात रुग्णाला देण्यात आलेल्या स्टेरॉइडमुळे हा त्वचाविकार रुग्णांमध्ये दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार रोगप्रतिकार शक्ती खालावल्याने हा आजार होतो.
- अंगावर पित्त उठणे
ताप, सर्दी व खोकल्यासोबतच अंगावर लाल चट्टे येऊन पित्त उठणे हीसुद्धा लक्षणे कोरोनाची असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. कोरोनावर उपचारानंतरही काही रुग्णांमध्ये हे लाल चट्टे दिसून आले आहे.
-कोरोनानंतर केसगळतीचे रुग्ण अधिक
कोरोनानंतर केसगळतीची समस्या घेऊन रोज जवळपास पाचवर रुग्ण येत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. अभ्यासातही कोरोना झालेल्यांमध्ये केसगळतीचे अधिक रुग्ण दिसून आले आहेत. कोरोनाकाळातील ताणतणाव हेच केसगळतीचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोट...
कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर त्वचाविकाराचा रुग्णांवर अभ्यास केला जात आहे. सध्या हा अभ्यास प्राथमिक स्वरूपात आहे. लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचून त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे.
-डॉ. जयेश मुखी, प्रमुख त्वचारोग विभाग