मामाच्या लग्नात नाचणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला ट्रॅव्हल्सने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 03:31 PM2021-12-22T15:31:51+5:302021-12-23T10:47:55+5:30

उमरेड रोडवर कान्हा सेलिब्रेशनसमोर का भरधाव ट्रॅव्हल्सने पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून संतप्त नातेवाइकांनी बसची तोडफोड करीत आक्रोश व्यक्त केला.

Five-year-old boy dancing in wedding crushed by bus in umred road | मामाच्या लग्नात नाचणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला ट्रॅव्हल्सने चिरडले

मामाच्या लग्नात नाचणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला ट्रॅव्हल्सने चिरडले

googlenewsNext
ठळक मुद्देउमरेड मार्गावरील घटनासंतप्त नागरिकांनी फोडली बस

नागपूर : मामाच्या लग्नाचा आनंद घेत कुटुंबीयांसह लग्नात नाचत असलेल्या बालकाला ट्रॅव्हल्सने चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी उमरेड मार्गावरील कान्हा सेलिब्रेशन हॉल समोर घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी दगडफेक करून बसला आग लावण्याचा प्रयत्न केला.

शुभम साजन काकडे (५) रा. पारशिवनी असे या अपघातातमृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. बुधवारी उमरेड मार्गावरील कान्हा सेलिब्रेशन लॉनमध्ये शुभमच्या मामाचे लग्न होते. शुभम आईवडील आणि इतर नातेवाईकांसह मामाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी नागपूरला आला होता. दुपारी १२ वाजता कान्हा सेलिब्रेशनसमोर लग्नाच्या वरातीत सामील नातेवाईक डान्स करीत होते. नातेवाईकांच्या गर्दीत शुभमही सामील झाला होता. यात काही नातेवाईकांनी लग्नात पैसे उडविले. त्यावेळी उमरेडच्या दिशेने केजीएन ट्रॅव्हल्सची बस (एम.एच. १२, के.क्यू - १८९९) आली. अचानक भरधाव असलेल्या बसखाली शुभम येऊन गंभीर जखमी झाला.

या घटनेमुळे लग्नातील नातेवाईकात खळबळ उडाली. शुभमला त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लग्नातील नातेवाईकांपासून बचाव करण्यासाठी बसचा चालक फरार झाला. परंतु काही अंतरावर पांडव कॉलेजसमोर नागरिकांनी या बसला थांबविले. बसमध्ये प्रवासी बसले होते. नागरिकांनी दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या तसेच बसला आग लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वरचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. झोन चारचे पोलीस उपायुक्त नुरुल हसनही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला शांत करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे लग्न समारंभात शोककळा पसरली.

तीन दिवसाच्या आत रस्ते अपघातात बालकाचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. २० डिसेंबरला ताजाबादच्या आझाद कॉलनी येथील गुलशन चौकात महापालिकेच्या टँकरने शाळेतून परत जाणाऱ्या आठ वर्षाचा बालक मो. अयान मो. इरफानला चिरडले होते.

या घटनेत शुभमचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून बसचालक पसार झाला आहे. घटनास्थळी जमलेल्या संतप्त नागरिकांनी बसच्या काचा फोडल्या. माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Five-year-old boy dancing in wedding crushed by bus in umred road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.