टाटा सुमाेची दुचाकीला धडक; अपघातात पाचवर्षीय बालिकेचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 11:37 AM2022-11-02T11:37:38+5:302022-11-02T11:39:52+5:30
काटाेल शहरातील घटना
नागपूर/काटाेल : अज्ञात वाहनाने दुचाकीला कट मारल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ती दुचाकी दुसऱ्या लेनवर काेसळली. त्यातच वेगात आलेल्या टाटा सुमाेने दुचाकीसह दुचाकीस्वारांना जाेरात धडक दिली. यात पाचवर्षीय बालिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिचे वडील गंभीर तर आई किरकाेळ जखमी झाली. ही घटना काटाेल शहरातील पंचवटी भागात मंगळवारी (दि. १) सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली.
हिमांशी दीपक भाेंग (५) असे मृत बालिकेचे, तर दीपक भाेंग व ज्याेती भाेंग असे जखमी वडील व आईचे नाव आहे. भाेंग कुटुंबीय सावनेर शहरातील रहिवासी असून, ते दुचाकीने (क्र. एमएच ३१ एफके ४४७९) नागपूरहून काटाेलमार्गे पारडसिंगा (ता. काटाेल) येथे जात हाेते. शहरातील पंचवटी स्थित बासेवार काॅम्प्लेक्ससमाेर मागून आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्या वाहनाचा धक्का लागल्याने दीपक यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती दुचाकी दुसऱ्या लेनवर गेली व तिघेही खाली काेसळले.
स्वत:ला सावरण्याच्या आता वेगात आलेल्या टाटा सुमाेने (क्र. एमएच २४ सी ४९३१) त्या तिघांनाही जाेरात धडक दिली. त्यात हिमांशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिचे वडील दीपक गंभीर, तर आई ज्याेती किरकाेळ जखमी झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही जखमींना उपचारासाठी तर हिमांशीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालात नेला. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर दाेन्ही जखमींना नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी ज्याेती भाेंग यांच्या तक्रारीवरून टाटा सुमाे चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.