पाच वर्षांत १,११८ शेतकरी वळले मूळ बियाण्यांच्या लागवडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 09:21 AM2021-05-27T09:21:10+5:302021-05-27T09:21:59+5:30

Nagpur News महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन धान उत्पादक जिल्ह्यांतील १,११८ शेतकरी मूळ बियाण्यांच्या शोधाकडे आणि संवर्धनाकडे वळले आहेत.

In five years, 1,118 farmers turned to native seed cultivation | पाच वर्षांत १,११८ शेतकरी वळले मूळ बियाण्यांच्या लागवडीकडे

पाच वर्षांत १,११८ शेतकरी वळले मूळ बियाण्यांच्या लागवडीकडे

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाला विदर्भातील धानाच्या पट्ट्यात यश

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन धान उत्पादक जिल्ह्यांतील १,११८ शेतकरी मूळ बियाण्यांच्या शोधाकडे आणि संवर्धनाकडे वळले आहेत. २०१४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमातून लुप्त होत चाललेले धान, जवस, लाखोळी, कंदमुळे, रानभाज्या आणि रानफळे पुन्हा माळरानावर दिसायला लागली आहेत.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च पुणे यांच्या सहकार्याने २०१४ पासून तीन जिल्ह्यांतील साकोली, भंडारा, मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, ब्रह्मपुरी आणि नागभीड या ६ तालुक्यांत हा उपक्रम राबविला जात आहे. भंडारा येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या माध्यमातून या तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू आहे.

धानाच्या लाखावर मूळ जाती लुप्त झाल्याने यावर अधिक भर आहे. या उपक्रमातून पारंपरिक धानाचा शोध व संरक्षण आणि बीज शुद्धीकरणासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर १४३ एकरांत हा उपक्रम सुरू आहे. लुचई पिवळी, चिन्नोर, काली कम्मोर, हिरानथी (तुळशी मंजुळा), दुबराज, काळीकन्नीचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे सुरू आहे. एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे हे बियाणे हस्तांतरित होऊन पेरले जात असल्याने दरवर्षी हे क्षेत्र वाढत आहे.

धानच नाही तर रानभाज्या, रानकंदही !

केवळ धानच नाही तर दुर्मीळ झालेला पांढरा जवस आणि करड्या जवसाचा प्रयोगही ७२ एकरांत यशस्वी झाला आहे. यासोबत लाख व लाखोळी ९८ एकरांत घेण्यात येत आहे. १,११८ शेतकरी यास सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ८०४.१० क्विंटल धान्य व ३१६.६९ क्विंटल बियाणे यातून निर्माण झाले आहे. रबीत लाख, लाखोळी व जवसाचे ३२९ एकरांत उत्पन्न घेतल्याची नोंद आहे. इतर पारंपरिक १८ बियाण्यांचा शोध घेऊन बीज शुद्धीकरण प्रक्रिया सुरू आहे. सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात रानभाज्यांचे ३२ प्रकार, रानकंदांचे १२ व रानफळांचे ११ प्रकार संवर्धित झाले आहेत.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून गावपातळीवर जैवविविधता जपणूक आणि व्यवस्थापन प्रक्रियेसाठी तीनही जिल्ह्यांतील ३६ ग्रामपंचायतींमध्ये जैविविधता समित्यांची स्थापना केली. १२ संस्थांना क्षमता विकासाचे प्रशिक्षण दिले. परसबाग लागवडीसाठी महिलांना प्रोत्साहित केले.

- अविल बोरकर, सचिव, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा

...

Web Title: In five years, 1,118 farmers turned to native seed cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती