बालिकेसोबत अश्लील कृत्य आरोपीला पाच वर्षे कारावास

By admin | Published: February 26, 2015 02:17 AM2015-02-26T02:17:02+5:302015-02-26T02:17:02+5:30

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षांच्या बालिकेसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयाने एका आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास ...

Five years of imprisonment for the accused with pornography | बालिकेसोबत अश्लील कृत्य आरोपीला पाच वर्षे कारावास

बालिकेसोबत अश्लील कृत्य आरोपीला पाच वर्षे कारावास

Next

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षांच्या बालिकेसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयाने एका आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार ३०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
उमेश गंगाराम लांबट (३६) रा. नागपूर हाऊसिंग सोसायटी वाठोडा ले-आऊट, असे आरोपीचे नाव असून तो इलेक्ट्रिशियन आहे.
सरकार पक्षानुसार या प्रकरणाची हकीकत अशी, पत्नी मुलाला घेऊन माहेरी निघून गेल्याने आरोपी उमेश लांबट हा एकटाच राहत होता. घटनेच्या दिवशी २७ फेब्रुवारी २०१४ रोजी महाशिवरात्री होती. अगदी घरासमोरच्या महादेव मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पीडित मुलगी ही शेजारी राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलासोबत महाप्रसादासाठी मंदिरात गेली होती. प्रसाद घेऊन दोघेही घराकडे परतत असताना त्यांच्या मागावर असलेल्या उमेशने त्यांना पेप्सीचे (सुपारी मसाला) पाऊच दिले होते. या दोघांनाही त्याने आपल्या घरी नेले होते.
उमेशने मुलाला घरी जाण्यास सांगितले होते. परंतु तो घरी न जाता उमेशच्या घराच्या दारातच उभा होता. मुलगी घरी परतली नाही म्हणून पीडित मुलीची आई तिचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडली. तिला उमेशच्या दारात मुलगा उभा असलेला दिसला; कारण तिला आपली मुलगी या मुलासोबत मंदिरात गेल्याचे माहीत होते. तिने त्याला मुलीबद्दल विचारताच त्याने इशाऱ्याने ती उमेशच्या घरात असल्याचे सांगितले होते. आईने मुलीला जोराने आवाज देताच ती रडत घराबाहेर आली होती. तिने काकाने केलेले कृत्य सांगितले होते. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने या मुलीला दिली होती. लागलीच या घटनेची सूचना नंदनवन पोलिसांना देण्यात आली.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक वाय.व्ही. इंगळे यांनी उमेश लांबट याच्याविरुद्ध भादंविच्या ३७६ (२) (१), ५०६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलम १० आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त टी.डी. गौंड यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ३७६ (२) (१), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम १० अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, भादंविच्या ५०६ कलमान्वये तीन महिने कारावास, ३०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वर्षा आगलावे, आरोपीच्या वतीने अ‍ॅड. खंडारे यांनी काम पाहिले. नायक पोलीस शिपाई अनिल दोनाडकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)

Web Title: Five years of imprisonment for the accused with pornography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.