कुख्यात समशेरला पाच वर्षे कारावास

By Admin | Published: October 28, 2015 02:56 AM2015-10-28T02:56:09+5:302015-10-28T02:56:09+5:30

तब्बल ३५ वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय असलेला, काही काळ आपल्या गुन्हेगारी कृत्याने संपूर्ण उपराजधानीला वेठीस धरणारा ‘नागपुरी डॉन’ हसनबाग येथील कुख्यात गुन्हेगार समशेर अली रमजान अली ..

Five years imprisonment for notorious Sasher | कुख्यात समशेरला पाच वर्षे कारावास

कुख्यात समशेरला पाच वर्षे कारावास

googlenewsNext

पहिलीच शिक्षा : ३५ वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय
नागपूर : तब्बल ३५ वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय असलेला, काही काळ आपल्या गुन्हेगारी कृत्याने संपूर्ण उपराजधानीला वेठीस धरणारा ‘नागपुरी डॉन’ हसनबाग येथील कुख्यात गुन्हेगार समशेर अली रमजान अली आणि त्याच्या भावाला मंगळवारी पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने एका प्रॉपर्टी डिलरवरील खुनी हल्ल्यात पाच वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दिवसाढवळ्या गुन्हेगारी करूनही ठोस साक्षीपुराव्यांअभावी निर्दोष ठरत असलेल्या समशेरला पहिल्यांदाच ही शिक्षा झाली असून उपराजधानीतील गुन्हेगारी विश्वासाला जबर धक्का बसला आहे.
शिक्षा झालेल्यामध्ये मुजफ्फर अली रमजान अली (४५) याचा समावेश आहे. तो समशेरचा लहान भाऊ आहे. याच प्रकरणात त्याचा आणखी एक भाऊ गफ्फार अली रमजान अली हा आरोपी होता. खटला सुरू असताना त्याचा खून झाल्याने त्याला खटल्यातून वगळण्यात आले होते.
काय होते प्रकरण ?
अलीमखान तसलीमखान (४३) रा. हसनबाग हा या प्रकरणातील फिर्यादी आहे. घटनेच्या वेळी अलीमखान हा प्रॉपर्टी खरेदी-विक्री आणि बांधकामाचा व्यवसाय करायचा. प्रॉपर्टीच्या देवाणघेवाणवरून अलीमखान याचे समशेरसोबत जुने भांडण होते. अलीमखान याने समशेरच्याविरुद्ध पोलिसात तक्रारही केली होती. त्यामुळे समशेर हा त्याच्यावर आणखीच चिडलेला होता.
२८ डिसेंबर २०१३ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास अलीमखान हा आपल्या मोटरसायकलवर समशेरचा भाऊ मुजफ्फर याच्या लकी चिकन सेंटरनजीक असलेल्या मोबीनच्या पानठेल्यावर पान खाण्यासाठी गेला होता.
त्याला पाहून समशेर आणि गफ्फार हे दोघे हातात तलवार घेऊन त्याला मारण्यास धावले होते. समशेरने त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करताच अलीमखान हा आपली मोटरसायकल घटनास्थळी सोडून आपल्या घराकडे पळून जाऊ लागला होता. त्याच वेळी समशेरने मुजफ्फर याला मोटरसायकलवर बसवून अलीमखानचा पाठलाग सुरू केला होता. त्याला रस्त्यात गाठून समशेरने त्याच्या डोक्यावर पुन्हा तलवारीने वार करून त्याला रक्तबंबाळ केले होते. आरडाओरड ऐकून अलीमखानचे कुटुंब त्याला वाचविण्यास धावताच समशेर आणि त्याचे भाऊ पसार झाले होते. रक्तबंबाळ अवस्थेतच अलीमखान हा नंदनवन पोलीस ठाण्यात गेला होता. या ठिकाणाहून त्याला मेडिकल कॉलेज इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
तडीपार असतानाच केला होता हल्ला
हसनबागेत समशेरने आपल्या दोन भावांना सोबत घेऊन अलीमखानवर प्राणघातक हल्ला केला तेव्हा तो तडीपार होता. त्याला अकोला येथे सोडण्यात आले होते.
अलीमखान याच्या तक्रारीवरून समशेर आणि त्याच्या दोन्ही भावांविरुद्ध भादंविच्या ३०७, ३२६, ३४, शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५, १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. समशेरला २९ डिसेंबर २०१३ रोजी , गफ्फारला १ जानेवारी २०१४ रोजी आणि मुजफ्फरला २३ जानेवारी २०१४ रोजी अटक करण्यात आली होती.
पोलीस उपनिरीक्षक जे. पी. परदेशी यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन समशेर आणि त्याचा भाऊ मुजफ्फर अली यांना शिक्षा सुनावण्यात आली.
मुजफ्फर अली हा जामिनावर असल्याने शिक्षा सुनावताच त्याला त्वरित ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अजय साजन निकोसे, सरकार पक्षाला मदत म्हणून फिर्यादी अलीमखान याच्या वतीने अ‍ॅड. ममता जयसिंघानी यांनी काम पाहिले. नायक पोलीस शिपाई अनिल दोनाडकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)

८६ प्रकरणांचा अभिलेख दाखल
सध्या ५१ वर्षे वय असलेला समशेर हा बालपणापासूनच गुन्हेगारीत सक्रिय आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, जबरीचोरी, दरोडा, सरकारी नोकरांवर हल्ला, अग्निशस्त्र बाळगणे, असे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सरकार पक्षाने त्याच्याविरुद्धच्या ८६ प्रकरणांचा अभिलेखच न्यायालयात दाखल केला होता.

Web Title: Five years imprisonment for notorious Sasher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.