पाच वर्षांत विद्यापीठात १८०० हून अधिक नवीन ‘कोर्सेस’चा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:42+5:302021-09-02T04:16:42+5:30
योगेश पांडे नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पाच वर्षांअगोदर ‘चॉइढस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली लागू झाली. यामुळे विद्यापीठातील ...
योगेश पांडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पाच वर्षांअगोदर ‘चॉइढस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली लागू झाली. यामुळे विद्यापीठातील नवीन ‘कोर्सेस’मध्ये चांगलीच वाढ झाली. २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत विद्यापीठात अठराशेहून अधिक नवीन ‘कोर्सेस’ सुरू झाले; परंतु यातील नेमक्या किती ‘कोर्सेस’चा विद्यार्थी लाभ घेतात हा संशोधनाचाच विषय आहे.
विदेशातील विद्यापीठांप्रमाणे देशातील विद्यापीठातदेखील विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय शिकता यावेत, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढाकार घेतला. यातूनच ‘चॉइस बेस क्रेडिट’ प्रणालीची सुरुवात झाली. नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापक याच्या समर्थनार्थ नव्हते. यामुळे वेळापत्रक बिघडेल तसेच ‘चॉइस’ फार जास्त असल्यामुळे ते विषय शिकवायचे कसे, असा त्यांचा प्रश्न होता. नागपूर विद्यापीठात २०१५-१६ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘सीबीसीएस’ प्रणाली लागू करण्यात आली. पहिल्या वर्षी तर विद्यापीठातील एकाही विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर शाखांच्या विषयांची निवड केली नव्हती.
तरीदेखील विद्यापीठाने पाच वर्षांत नवीन ‘कोर्सेस’ सुरू केले. २०१५-१६ पासून १ हजार ८५२ नवीन ‘कोर्सेस’ लागू झाले. मागील पाच वर्षांत विद्यापीठात एकूण ९ हजार १७५ ‘कोर्सेस’ राबविले जात होते. त्यांच्या तुलनेत नवीन ‘कोर्सेस’ची टक्केवारी २०.१९ टक्के इतकी होती. नागपूर विद्यापीठातील एकूण ८५.१९ टक्के अभ्यासक्रमांत ‘सीबीसीएस’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. ‘नॅक’च्या ‘एसएसआर’मध्ये ही सर्व आकडेवारी दर्शविण्यात आली आहे. ‘नॅक’च्या मूल्यांकनादरम्यान ही आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस’कडे फारसा ओढा नाही
पाच वर्षांत विद्यापीठाने ४८ ‘व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस’ सुरू केले. सरासरी २८.५ टक्के विद्यार्थ्यांनीच या ‘कोर्सेस’ची निवड केली. दरम्यान, ‘चॉइस बेस क्रेडिट’ प्रणालीच्या नियमांनुसार विद्यार्थी ‘फाउंडेशन कोर्स’ म्हणजेच आवडत्या विषयासाठी कुठल्याही विद्याशाखेतील विषयाची निवड करू शकत होते; परंतु प्रत्यक्षात संपूर्ण विद्यापीठातील फारच कमी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्याशाखेतील किंवा दुसऱ्या अभ्यासक्रमातील विषयाची निवड केली.
विद्यापीठाने लागू केलेले ‘कोर्सेस’
इलेक्टिव्ह कोर्सेस - १,८५२
व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस - ४८