माैजमस्ती जीवावर बेतली; माेहगाव झिल्पी तलावात नागपूरचे पाच तरुण बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 11:05 AM2023-07-03T11:05:05+5:302023-07-03T11:07:58+5:30
मृतदेह बाहेर काढले
हिंगणा (नागपूर) : माेहगाव-झिल्पी (ता. हिंगणा) शिवारातील तलावाच्या काठी रविवारी (दि. २) सायंकाळी फिरायला आलेल्या नागपूर शहरातील सहा तरुणांपैकी पाचजण माैजमस्ती करीत तलावात पाेहण्यासाठी उतरले. त्या पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. सर्वजण नागपूर शहरातील रहिवासी असून, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
मृतांमध्ये ऋषिकेश पराळे (वय २१, रा. वाठोडा, नागपूर), राहुल मेश्राम (२३, गिड्डाेबा मंदिर चौक, वाठोडा, नागपूर), वैभव भागेश्वर वैद्य (२४, रा. भांडेवाडी रोड, पारडी, नागपूर), शंतनू (२३) यांच्यासह अन्य एका तरुणाचा समावेश असून, त्याचे नाव कळू शकले नाही. रविवारी सुटी असल्याने ऋषिकेश त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तीन मित्रांसाेबत सायंकाळी माेहगाव-झिल्पी येथील तलावाकाठी फिरायला आला हाेता.
काही वेळाने पाचजण तलावात पाेहण्यासाठी उतरले आणि खाेल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे डाॅ. प्राजक्त लेंडे यांनी आरडाओरड केली. मदतीला कुणीही धावून न आल्याने त्यांनी पाेलिस नियंत्रण कक्ष व हिंगणा पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून स्थानिक नागरिक रेखराम भोंडे व शंकर मोरे यांच्या मदतीने बुडालेल्यांचा पाण्यात शाेध घ्यायला सुरुवात केली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह शाेधण्यात पाेलिसांना यश आले. यावेळी घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त प्रवीण तेजाळे, तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर, ठाणेदार विशाल काळे, पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन, दत्ता वाघ, तलाठी ऋतुजा मोहिते उपस्थित हाेते.
डाॅक्टर समाेर बुडाले सर्वजण
ऋषिकेश हा डॉ. प्राजक्त मोरेश्वर लेंडे (३२, रा. रमना मारोती चौक, नागपूर) यांच्याकडे कारचालक म्हणून नाेकरी करायचा. त्याने डाॅ. प्राजक्त लेंडे यांना फाेनवर आपण मित्रांसाेबत माेहगाव-झिल्पी तलावाच्या काठी फिरायला आलाे असून, तुम्ही पण या, अशी सूचना केली हाेती. डाॅ. प्राजक्त व वैभव वैद्य कार(एमएच-४९/बीके-५५०१)ने तलावाजवळ पाेहाेचले. ते कारजवळ उभे असताना पाचजण पाण्यात उतरले आणि काही वेळात बुडाले.
पेंचच्या डोहात बुडून नागपूरच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
पाराशिवनी : नागपूरहून मित्रांसाेबत घाेगरा (ता. पारशिवनी) शिवारातील पेंच नदीच्या काठी फिरायला आलेला विद्यार्थी पाेहण्यासाठी चिखली डाेहात उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २) सकाळी घडली. आलोक अमोल नेवारे (१७, धावडे मोहल्ला, जुनी मंगळवारी, गंगाबाई घाट, नागपूर) असे मृताचे नाव आहे. आलोक यावर्षी सिंधी हिंदी हायस्कूल बगडगंज, नागपूर येथून इयत्ता बारावी उत्तीर्ण झाला हाेता. तो आठ मित्रांसाेबत रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास पेंच नदीच्या काठी असलेल्या श्रीक्षेत्र घाेगरा येथे फिरायला आला हाेता. मंदिरात भगवान महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व जण आंघाेळ करण्यासाठी चिखली डाेहाजवळ गेले.
आपल्याला पाेहता येत असल्याचे सांगून आलाेक डाेहातील खाेल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. पाण्यात बुडताच मित्रांनी आरडाओरड केली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने आलाेकचा पाण्यात शाेध घेतला. दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे करीत आहेत.