नागपूर जिल्ह्यात ११ पंचायत समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:17 AM2020-01-18T11:17:47+5:302020-01-18T11:19:08+5:30
नागपूर जिल्ह्यातील तेराही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. यात जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडीचे सभापती, उपसभापती विजयी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील तेराही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. यात जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडीचे सभापती, उपसभापती विजयी झाले. कामठीत पंचायत समितीत ईश्वर चिठ्ठीने भाजपला सभापतिपद मिळाले तर कुहीत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली. मौदा पंचायत समितीत काँग्रेस-सेना एकत्र येत सत्ता स्थापन केली. रामटेकमध्ये मात्र स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग फसला.
जिल्ह्यातील १३ तालुक्याच्या ११६ पंचायत समिती गणाचे निवडणूक निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाले होते. यात काँग्रेसला (५९), राष्ट्रवादी (२३), भाजप (२४), शिवसेना (३), शेकाप (१) आणि दोन जागावर इतर आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते.
१३ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार पंचायत समिती सभापती आणि उपसभापतिपदाची निवड घेण्यात आली. यात ८ पंचायत समितीच्यावर काँग्रेस, २ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस, एका पंचायत समितीवर शेकाप आणि दोन पंचायत समितीवर भाजपचे सभापती विराजमान झाले. नरखेड पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव आहे. येथे आठही जागावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नीलिमा रेवतकर यांची सभापती तर वैभव दळवी यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली. काटोल पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (५), काँग्रेस (१) आणि शेकापचा (१) उमेदवार विजयी झाला आहे. या तिन्ही पक्षाच्या आघाडीजवळ बहुमत असल्याने शेकापचे धम्मपाल खोब्रागडे यांची सभापतिपदी तर राष्ट्रवादीच्या अनुराधा अनुप खराडे यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली. कळमेश्वर पंचायत समितीच्या सहाही जागावर काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसचे श्रावण भिंगारे तर उपसभापतिपदी जयश्री वाळके यांची अविरोध निवड झाली आहे. सावनेर पंचायत समितीच्या बाराही जागावर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. सभापतिपद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव आहे. कॉँग्रेसच्या अरुणा शिंदे यांची सभापतिपदी तर प्रकाश पराते यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली. पारशिवनी पंचायत समितीच्या आठपैकी सहा जागावर काँग्रेसला विजय मिळाला आहे. त्यामुळे बहुमताच्या बळावर अनुसूचित जाती महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या मीना कावळे तर उपसभापतिपदी चेतन देशमुख यांची अविरोध निवड झाली आहे. रामटेक पंचायत समितीच्या एकूण दहा जागापैकी पाच जागेवर काँगे्रस, शिवसेना (४) आणि एका जागेवर भाजपचा विजय झाला आहे. येथे नामाप्र (महिला) संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या कला उमेश ठाकरे तर उपसभापतिपदी रवींद्र कुमरे विजयी झाले. मौदा पंचायत समितीच्या १० पैकी पाच जागावर काँग्रेसचे, भाजप (३) आणि शिवसेनेचा दोन जागावर विजय झाला आहे. नामाप्र महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या दुर्गा ठाकरे तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या रक्षा थोटे यांची अविरोध निवड झाली. येथे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याने बहुमताचा आकडा गाठता आला. नागपूर ग्रामीण पंचायत समितीच्या १२ पैकी सहा जागावर काँग्रेस, राष्ट्रवादी (२), भाजप (३) आणि वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीजवळ बहुमत असल्याने अनुसूचित जमाती महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या रेखा वरठी तर राष्ट्रवादीचे संजय चिकटे यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली. हिंगणा पंचायत समितीच्या १४ पैकी आठ जागावर राष्ट्रवादी तर सहा जागावर भाजपचा विजय झाला आहे. नामाप्र संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे बबनराव अव्हाले तर उपसभापतिपदी सुषमा कावळे विजयी झाल्या. उमरेड पंचायत समितीच्या आठही जागावर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसचे रमेश किलनाके तर उपसभापतिपदी सुरेश लेंडे यांची अविरोध निवड झाली. कुही पंचायत समितीच्या आठपैकी पाच जागावर भाजपला तर तीन जागावर काँग्रेसला विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी भाजपच्या अश्विनी शिवणकर तर उपसभापती वामन श्रीरामे यांची अविरोध निवड झाली. भिवापूर पंचायत समितीच्या चारपैकी तीन जागावर काँग्रेसचा तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे नामाप्र संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या ममता शेंडे तर उपसभापतिपदी कृष्णा घोडेस्वार यांची अविरोध निवड झाली.
कामठीत भाजपला देव पावला
कामठी पंचायत समितीच्या आठ जागापैकी भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षाकडे बहुमत नसल्याने सभापती आणि उपसभापतिपदाची ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली. यात भाजपचे उमेश रडके यांची सभापती तर काँग्रेसचे आशिष मल्लेवार यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली.