व्यवस्थापन परिषदेवर शिक्षण मंचचा झेंडा; विविध समित्यांवर सदस्यांची बिनविरोध निवड
By जितेंद्र ढवळे | Published: June 7, 2023 05:25 PM2023-06-07T17:25:10+5:302023-06-07T17:26:26+5:30
विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात बुधवारी अधिसभेतून (सिनेट) व्यवस्थापन परिषदेसह विविध समित्यांवरील रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसह विविध समित्यांच्या निवडणुकीत शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद समर्थित उमेदवारांनी बाजी मारली आहे.
विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात बुधवारी अधिसभेतून (सिनेट) व्यवस्थापन परिषदेसह विविध समित्यांवरील रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. तीत अधिसभेच्या सदस्यांमधून प्राचार्य, अध्यापक व विद्यापीठ अध्यापक, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, नोंदणीकृत पदवीधर या गटातून व्यवस्थापन परिषदेवर सदस्यांची निवड करण्यात आली. यात प्राचार्य गटात खुल्या प्रवर्गातून डॉ. निळकंठ लंजे, इतर मागासवर्ग प्रवर्गातून डॉ. देवेंद्र भोंगाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यापक व विद्यापीठ अध्यापक गटात खुल्या प्रवर्गातून डॉ. योगेश भुते तर इतर मागासवर्ग प्रवर्गातून डॉ. पांडुरंग डांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
व्यवस्थापनाचे प्रतिनिधी गटातून खुल्या प्रवर्गात अजय अग्रवाल यांची निवड करण्यात आली. नोंदणीकृत पदवीधर गटात खुल्या प्रवर्गातून अजय चव्हाण तर भटक्या जमाती प्रवर्गातून वामन तुर्के यांची व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या अधिसभा बैठकीला, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, अधिसभा सदस्य विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
विविध समित्यांवर नामनिर्देशन
अधिसभेचे सदस्य असलेल्या व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींमधून विद्या परिषदेवर एक व्यवस्थापन प्रतिनिधी नामनिर्देशित करण्यात येतो. या गटामध्ये एकच अर्ज प्राप्त झाल्याने डॉ. उमेश पांडुरंग तुळसकर यांचे विद्यापरिषदेवर बिनविरोध नामनिर्देशन करण्यात आले. यासोबतच प्राचार्यांमधून एक प्राचार्य स्थायी समितीवर नामनिर्देशित करण्यात येतो. या गटात डॉ. सचिन उंटवाले यांचे स्थायी समितीवर बिनविरोध नामनिर्देशन करण्यात आले. अधिसभेचा सदस्य असलेल्या अध्यापकांमधून एक अध्यापक स्थायी समितीवर नामनिर्देशित करण्यात येतो.
या गटात डॉ. संदीप गायकवाड यांचे स्थायी समितीवर बिनविरोध नामनिर्देशन करण्यात आले. नोंदणीकृत पदवीधरांमधून एक पदवीधर स्थायी समितीवर नामनिर्देशित करण्यात आला. या गटात मनीष वंजारी यांचे बिनविरोध नामनिर्देशन करण्यात आले. तक्रार निवारण समितीवर अध्यापक गटामधून डॉ. पांडुरंग सदाशिव डांगे तर शिक्षकेतर कर्मचारी गटामधून मनोज मलकापुरे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.