विदर्भातील ध्वजारोहण हुबळीच्या ध्वजांनी
By admin | Published: August 12, 2015 03:55 AM2015-08-12T03:55:28+5:302015-08-12T03:55:28+5:30
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. ध्वजाच्या निर्मितीचीही संहिता आहे. त्यामुळे ध्वजसंहिता पाळूनच ध्वजाची
मंगेश व्यवहारे ल्ल नागपूर
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. ध्वजाच्या निर्मितीचीही संहिता आहे. त्यामुळे ध्वजसंहिता पाळूनच ध्वजाची निर्मिती केली जाते. राष्ट्रध्वजाच्या संहितेनुसार नागपुरात पूर्वी दोन कारागीर ध्वजांची निर्मिती करायचे. या दोघांचाही मृत्यू झाल्याने, नागपुरातील ध्वजनिर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे थेट हुबळीहून ध्वजाची मागणी करावी लागत आहे.
गांधीसागर तलावासमोरील खादी ग्रामोद्योग भवन हे ध्वजसंहितेनुसार विक्री करणारे अधिकृत केंद्र आहे. १९६० पासून येथे ध्वजनिर्मिती केले जाते. याला विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथून ध्वजाची मागणी असते. या केंद्रातून स्वातंत्र्यदिनाला जवळपास ५ ते ७ हजार ध्वजांची विक्री होते. नागपुरात भाऊराव पांडे व धापोडकर हे ध्वजनिर्मिती करायचे. अशफाक नावाचे कारागीर ध्वजावरील अशोकचक्र निर्मितीचे काम करायचे. दोन वर्षापूर्वी भाऊराव पांडे यांचे निधन झाले. धापोडकरांचाही मृत्यू झाला. त्यानंतर ध्वजनिर्माते कारागीर तयार न झाल्याने, नागपुरातून ध्वजाची निर्मिती बंद झाली. गेल्या दोन वर्षापासून कर्नाटक येथील हुबळी येथून ध्वजांची मागणी करण्यात येते. स्वातंत्र्य दिनाला नागपुरातील खादी ग्रामोद्योगातून जवळपास १० लाख रुपयांच्या ध्वजांची विक्री होते.
काय आहे ध्वजसंहिता
ध्वजारोहण सोहळ शासकीय असो की खाजगी, तिथे फडकविला जाणारा ध्वज हा ध्वजसंहितेनुसारच असावा. ध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड हे खादीचे असावे. ध्वजात केशरी, पांढरा, हिरवा व निळा रंगाचा वापर करण्यात येतो. ध्वजाच्या रंगातही कुठलीही तफावत राहता कामा नये. संहितेनुसार ठराविक आकाराचेच ध्वज असावेत. यात २ बाय ३, ३ बाय ४.५, ४ बाय ६ व ६ बाय ९ हे आकार ध्वजाचे आहेत. ध्वज बनविताना एक इंच आकारसुद्धा वाढता कामा नये. या संहिता पूर्ण झाल्यानंतरच ध्वजाला ‘आयएसआय’ मार्क देण्यात येतो.
टायगर हिलवर सर्वात मोठा ध्वज
कारगीलच्या युद्धात विजयश्री मिळविल्यानंतर टायगर हिलवर जो राष्ट्रध्वज फडकला तो ८ बाय १२ साईजचा होता. ध्वज संहितेनुसार देशाचा अभिमान वाढविणाऱ्या घटनेप्रसंगीच सर्वात मोठ्या आकाराचा ध्वज फडकविण्यात येतो. जिल्ह्याच्या मुख्यालयात म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयात फडकविण्यात येणारा ध्वज हा ६ बाय ९ या आकाराचा असतो. इतर सरकारी कार्यालयाला कुठल्या आकाराचा ध्वज घ्यावा याचा नियम नाही.
ध्वजनिर्मिती प्रक्रिया संवेदनशील
ध्वजनिर्मिती संदर्भात जी संहिता दिलेली आहे त्याच संहितेत निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यामुळेच नागपुरातील दोन कारागीरांच्या मृत्यूनंतर, शहरात भरपूर टेलर असताना, कुणालाही निर्मिती प्रक्रियेत सहभागी करून घेतले नाही. ध्वज खादीशिवाय इतर कुठल्याही कापडाचा बनविता येत नाही. त्याचे रंग, अशोकचक्रातील आरे संहितेनुसारच असावे. ही सर्व प्रक्रिया संवेदनशील असल्यामुळे बाहेर कुणालाही ध्वजनिर्मिती करण्यासाठी देता येत नाही.
तुलाराम नेहारे, व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग भवन, गांधीसागर