अग्निपथच्या ज्वाळा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? २० आणि २२ जूनला गोळा होण्याचे सांकेतिक आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 08:00 AM2022-06-18T08:00:00+5:302022-06-18T08:00:10+5:30
Nagpur News देशातील विविध प्रांतात धगधगणाऱ्या ‘अग्निपथ’च्या ज्वाळा चोहोबाजूने महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने सुरक्षा यंत्रणा पूर्णत: अलर्ट मोडवर आली आहे.
नरेश डोंगरे
नागपूर - देशातील विविध प्रांतात धगधगणाऱ्या ‘अग्निपथ’च्या ज्वाळा चोहोबाजूने महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्या आहेत. यासंबंधाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने सुरक्षा यंत्रणा पूर्णत: अलर्ट मोडवर आली असून, कसलाही धोका होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा कामी लागल्या आहेत.
सरकारने लष्कर भरतीच्या अनुषंगाने ‘अग्निपथ’ योजनेचे स्वरूप स्पष्ट केल्यापासून देशातील अनेक राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या योजनेच्या विरोधात ठिकठिकाणी हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, हिंसक आंदोलकांनी यूपी, बिहारमध्ये रेल्वेगाड्यांची जाळपोळ तसेच सरकारी गोदामाची तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे. काही राज्यात बसेसचीही तोडफोड करण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी गोळीबारही झाला आहे. अनेक राज्यात आंदोलकांनी रेल्वेगाड्यांना टार्गेट केल्यामुळे विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
खास करून बिहार, उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आंदोलनाचे लोण महाराष्ट्रालगतच्या मध्य प्रदेश, तेलंगणापर्यंत पोहचले आहे. राज्यात तूर्त असे कोणतेही आंदोलन अद्याप झालेले नाही. मात्र, गेल्या काही तासापासून वेगवेगळे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. २० आणि २२ तारखेला जळगावसह काही रेल्वेस्थानकावर गोळा होण्याचे सांकेतिक आवाहन या मेसेजमधून करण्यात आल्याची माहिती आहे.
स्पष्टपणे काही लिहिले नसले तरी हे मेसेज म्हणजे ‘अग्निपथ’च्या विविध राज्यात धगधगणाऱ्या ज्वाळा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्याचे संकेत असल्याचा अर्थ काढला जात आहे. हे मेसेज रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) हाती लागले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणा एकदम अलर्ट मोडवर आल्या आहेत. त्यामुळे जागोजागच्या पोलिसांच्या मदतीने जीआरपी आणि आरपीएफने सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
संयुक्त उपाययोजना
मेसेज व्हायरल झाले असले तरी अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाचा रेल्वेच्या नागपूर मंडळाला धोका होण्याची शक्यता दिसत नाही. मात्र, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरक्षेच्या उपाययोजना करणार आहोत, अशी माहिती या अनुषंगाने आरपीएफचे सिनियर कमांडंट आशुतोष पांडे यांनी लोकमतला दिली.
भविष्य खराब करू नका - एम. राजकुमार
आंदोलनाच्या माध्यमातून सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल होतात. अशा तरुणांना नंतर सरकारी नोकरीची संधी मिळत नाही. त्यामुळे कुणीही हिंसक आंदोलन करू नये, असे आवाहन जीआरपीचे एसपी एम. राजकुमार यांनी केले आहे.
----