मुंबई विमानतळावर नागपुरातील प्रवाशांचे हाल; एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाकडे दुर्लक्ष
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 15, 2024 10:48 PM2024-04-15T22:48:36+5:302024-04-15T22:48:56+5:30
वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेकदा क्रू सदस्यांना नियमानुसार मुदत संपल्यानंतर ड्युटी करता येत नाही.
नागपूर : एअर इंडियाचे मुंबई-नागपूर ६२९ विमानाचे उड्डाण अनेक दिवसांपासून वेळेवर होत नाही. मुंबई विमानतळावर विमानांची प्रचंड वाहतूक असल्याने या उड्डाणाच्या वेळेला प्राधान्य दिले जात नाही. शनिवारी विमानाला उशीर झाल्यामुळे या विमानातील प्रवाशांनी मुंबई विमानतळावर गोंधळ घातला होता.
वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेकदा क्रू सदस्यांना नियमानुसार मुदत संपल्यानंतर ड्युटी करता येत नाही. सोमवारीही या विमानाबाबत असेच घडले. रात्री ८ च्या सुमारास विमानाचा वैमानिक उपलब्ध नसल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. या उड्डाणासाठी उपलब्ध वैमानिक राजकोटहून येईल, असे सांगितले, पण ‘टेक ऑफ’ची कोणतीही स्पष्ट वेळ दिली नाही. उड्डाणाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पण त्यावेळी त्यांना तांत्रिक कारण सांगण्यात आले.
माहितीनुसार, हे विमान मुंबईहून सायंकाळी ७.२० वाजता सुटते आणि रात्री ८.५५ वाजता नागपुरात पोहोचते. या विमानाचे शेवटचे तिकिट १८ ते २० हजार रुपयांत देण्यात आल्याची माहिती आहे. अशा स्थितीत या विमानाने प्रवास करणे सर्वच दृष्टिकोनातून महागडे आहे. एआय-६२९ या विमानासाठी दोन ते चार तासांचा विलंब आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. नागपूरचे प्रवासी मुंबईत विमानात बसण्यासाठी थांबले होते. ते म्हणाले, लहानांपासून वयस्कांपर्यंत सर्वजण विमानाच्या प्रतीक्षेत होते. विमान कंपनीने प्रवाशांना विलंबाचे कोणतेही कारण स्पष्ट केले नाही, कोणताही संदेश किंवा संवाद साधण्यास रस दाखवला नाही. तसेच चहा आणि नाश्तादेखील दिला नाही.
गेट बदलत राहिले प्रवासी
प्रारंभी एआय ६२९ या विमानाच्या प्रवाशांसाठी गेट क्रमांक ४९ए निश्चित करण्यात आला होता. नंतर त्यांना गेट क्रमांक ४२बी आणि काही वेळाने गेट क्रमांक ४१ए देण्यात आला. अशा परिस्थितीत प्रवासी इकडून तिकडे भटकत राहिले. या विमानाने नागपुरात येण्याची वाट पाहणाऱ्यांमध्ये सौदी अरेबियातून मुंबईत पोहोचलेले एक कुटुंब चार तास विमानतळावर थांबले होते.