नागपूर-मुंबई दरम्यानची उड्डाणे थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:54 PM2020-06-11T23:54:30+5:302020-06-11T23:55:45+5:30
गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.
नागपुरातून एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या उड्डाणांचे संचालन व्हायचे. एअर इंडियाचे नागपूर ते दिल्लीदरम्यान आठवड्यात तीन दिवस उड्डाणे होती. तर इंडिगो दिल्ली, कोलकाताद्वारे पुणेकरिता उड्डाणांचे संचालन करीत होती. गेल्या आठवड्यापर्यंत इंडिगोचे नागपूरहून मुंबईदरम्यान उड्डाणे उपलब्ध होती. आता कोणतेही उड्डाण न राहिल्याने उपराजधानीचा राज्याच्या राजधानीसोबत हवाई मार्गाने कनेक्शन थांबले आहे. गो एअर एअरलाईन्स नागपूरहून अहमदाबाद व मुंबईकरिता विमानांचे संचालन करीत होती. पण दोन आठवड्यापासून कंपनीच्या विमानाचे कोणतेही संचालन झालेले नाही. नागपूरहून मुंबईकडे विमानांच्या उड्डाणांचे संचालन होत नसल्याच्या कारणांवर एअरलाईन्सने मौन साधले आहे.
एका विमान कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, राज्य शासनाने कोणत्याही विमान कंपन्यांची २५ येण्याचे आणि २५ जाण्याचे असे एकूण ५० उड्डाणे निर्धारित केल्याने नागपूर-मुंबई-मुंबईचे आॅपरेशन सध्या थांबविण्यात आले आहे. विमान कंपन्या नागपूरला जास्त महत्त्व देत नसल्याचे यावरून सिद्ध होते. अन्यथा कंपन्या मर्यादित उड्डाणांच्या संख्येत नागपूर-मुंबईचा समावेश करू शकली असती. महामारीमुळे विमानाचा लोड फॅक्टरमुळे कंपन्या आपल्या शेड्यूलमध्ये आपल्या पद्धतीने बदल करीत आहे. जास्त उड्डाणाच्या मार्गाला प्राधान्य देत आहे.