नागपुरातून कोलकाताकरिता उड्डाण; इंदूर, भुवनेश्वर सेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 10:46 AM2020-10-24T10:46:53+5:302020-10-24T10:48:37+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्ली आणि मुंबईनंतर आता कोलकाताकडे सकाळी उड्डाण होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्ली आणि मुंबईनंतर आता कोलकाताकडे सकाळी उड्डाण होणार आहे. इंडिगोचे विमान रात्री १०.३० वाजता कोलकाता येथून नागपुरात आल्यानंतर रात्रभर थांबणार आहे आणि हेच विमान सकाळी ६.५५ वाजता कोलकाताला रवाना होणार आहे.
या विमानसह कोलकाताकडे येथून दोन विमाने रवाना होतील. सध्या इंडिगो एअरलाईन्सतर्फे आठवड्यात तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी या मार्गावर एक विमान चालविण्यात येत आहे. कोलकाताकडे सकाळी रवाना होणारे विमान २६ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उड्डाण करणार आहे. १ नोव्हेंबरपासून विमानाचे संचालन दररोज होणार आहे. यामुळे कोलकाताकडे सकाळी रवाना होऊ रात्री परत येणाऱ्या प्रवाशांना सुविधा होणार आहे. लॉकडाऊननंतर विमानसेवा दुसऱ्यांदा सुरू झाल्यानंतर विमानाच्या संचालनात अनेक अडचणी येत होत्या. कोरोना महामारीमुळे कोरोनाचे रुग्ण जास्त असलेल्या शहरांमधून पश्चिम बंगाल सरकारने विमानाच्या उड्डाणांवर प्रतिबंध लावला होता. याशिवाय इंडिगोची उड्डाणे मुंबईकरिता सकाळी ६.१५ आणि दिल्लीकरिता सकाळी ६.४५ वाजता आहेत.
यादरम्यान इंदूर, भुवनेश्वर विमानसेवा बंद करण्यात आली आहे. मिहान इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या नवीन वेळापत्रकात या मार्गावर विमान सेवेची माहिती दिलेली नाही. पुरेसे प्रवासी न मिळाल्याने या मार्गावर विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहिती आहे. २५ आॅक्टोबरपासून दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद आणि हैदराबादकरिता विमाने उपलब्ध राहणार आहेत.