नागपूरपर्यंत उड्डाणासाठी लवकरच मिळणार मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:22 AM2018-09-12T10:22:41+5:302018-09-12T10:24:26+5:30
रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेंंतर्गत (आरसीएस) जर कोणतीही विमान कंपनी महाराष्ट्रातील छोट्या विमानतळावरून नागपूरपर्यंत उड्डाण संचालन करण्याचा प्रस्ताव देत असेल तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) त्याला तातडीने मंजुरी देणार आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात छोट्या विमानतळावरून विमानांच्या उड्डाणाचे संचालन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेंंतर्गत (आरसीएस) जर कोणतीही विमान कंपनी महाराष्ट्रातील छोट्या विमानतळावरून नागपूरपर्यंत उड्डाण संचालन करण्याचा प्रस्ताव देत असेल तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) त्याला तातडीने मंजुरी देणार आहे. याअंतर्गत जवाहरलाल दर्डा विमानतळ, यवतमाळला आरसीएसमध्ये सहभागी करण्यासाठी एमएडीसीने नागरी वाहतूक मंत्रालयाला प्रस्ताव पाठविला आहे.
एमएडीसीने पहिल्या टप्प्यात पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात राज्यातील नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर विमानतळाचा आरसीएसमध्ये समावेश केला आहे. या विमानतळांवरून उड्डाणे सुरू झाली आहेत, पण या भागातून नागपूरकरिता विमान सेवा सुरू झालेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मोठे विमानतळ असल्यामुळे आरसीएसमध्ये सहभागी करता येत नाही. पण छोट्या विमानतळावरून नागपुरात विमाने येऊ शकतात आणि येथून प्रवाशांना नेऊ शकतात.
राज्यांतर्गत प्रथम टप्प्यात आरसीएसमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विमानतळावरून जर कोणतीही विमान कंपनी नागपूरपर्यंत उड्डाणाचे संचालन करण्याची इच्छुक असेल तर नागपूरात स्लॉट मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही. यवतमाळ येथे धावपट्टी लहान असल्यामुळे त्यावर छोटे विमान उतरू शकतात. या धावपट्टीचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे, पण त्यावर अजूनही विचार झालेला नाही.
आरसीएसमध्ये सहभागी करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात लातूर, अकोला, अमरावती या शहरांचा समावेश आहे. योजनेंतर्गत नांदेड, औरंगाबाद आणि जळगाव येथून नागपूरकडे हवाईसेवा सुरू होत असेल तर कंपन्यांना पर्याप्त प्रवासी मिळू शकतात, शिवाय तिकीट दर कमी राहतील.
आठ दिवसांच्या नोटीसवर देणार मंजुरी
राज्यात आरसीएस योजनेंतर्गत विमानाचे संचालन करणाऱ्या लहान विमानतळाकडून जर नागपूरकरिता प्रस्ताव पाठविण्यात येत असेल तर त्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल. एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियातर्फे जर आठ दिवसांपूर्वी नोटीस दिला असेल तर संबंधित विमान कंपनीला नागपूर विमानतळावर स्लॉट देण्यात येईल. यवतमाळला आरसीएसमध्ये सहभागी करण्यासाठी नागरी वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- सुरेश काकाणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.