नागपुरातील पूर ठरला जीवघेणा, महिलेचा आढळला मृतदेह
By योगेश पांडे | Published: July 21, 2024 06:15 PM2024-07-21T18:15:33+5:302024-07-21T18:15:46+5:30
या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
नागपूर: शनिवारी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे केवळ नागपूर महानगरपालिकेच्या कामाचीच पोलखोल झाली नाही तर ह पूर जीवघेणादेखील ठरला. एका वृद्धा पाण्यात वाहून गेली व तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह रविवारी आढळला. बेलतरोडी व कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या असून प्रशासनाविरोधात नागरिकांचा प्रचंड रोष आहे.
श्रीहरी सोसायटी, नरेंद्रनगरमध्ये राहणाऱ्या सुधा विश्वेश्वर वेरुळकर (७०) या शनिवारी सायंकाळी बेसा-बेलतरोडी नाल्यातील पाणी बघायला गेल्या होत्या. त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या व वाहून गेल्या. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी पुराच्या पाण्यात त्यांचा शोध घेतला. मात्र अंधारात त्यांना यश आले नाही. रविवारी हुडकेश्वरमधील श्यामनगरातील नाल्यात सुधा यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांना मानसिक त्रास होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुरात उडी घेतलेल्याचा आढळला मृतदेह
तर शनिवारी नागनदीच्या पुरात वाहून गेलेले भोजराज धुलीचंद पटले (५२, रा. शामनगर, पुनापूर) यांचा मृतदेहदेखील सापडला. ते ऑटोमोटिव्ह चौकातील टाटा मोटर्समध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. शनिवारी नागनदी दुथडी भरून वाहत होती. सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान भोजराज यांनी भरतवाडा पुलाजवळ दुचाकी उभी केली. त्यानंतर ते पुलावर चढला आणि पाण्यात पडले. काहींनी त्यांनी उडी घेतल्याचा दावा घेतला होता. तेथील काही लोक भोजराजला ओळखत होते. त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला याची सूचना दिली.
त्यानंतर कळमना पोलीस व एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल) पथकाने भोजराजचा शोध घेतला. रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफचे पथक भोजराजचा शोध घेत होते. रविवारी सकाळी तीन किमी अंतरावर भोजराज यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरण कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.