वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 07:45 AM2021-06-14T07:45:19+5:302021-06-14T07:46:58+5:30

भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे.

Flood threat in 99 villages on the banks of Wainganga river | वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती

वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती

Next
ठळक मुद्देपुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीगतवर्षीच्या कटु अनुभवानंतर प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे. गतवर्षीच्या कटु अनुभवानंतर प्रशासन उपाययोजनांसाठी सज्ज झाले आहे.

मध्य प्रदेशातून उगम पावणारी वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यातून वाहते. नदीतीरावर ९९ गावे आहेत. त्यात भंडारा तालुक्यातील २९, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३, लाखांदूर ११ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत अनेकदा वैनगंगेच्या कोपाचा सामना करावा लागला. १४ ते १७ सप्टेंबर २००५ मध्ये आलेल्या महापुराने चार हजार लोक बाधित झाले होते. गतवर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत वैनगंगेला महापूर आला होता. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा लगतच्या कारधा पुलावर सतत तीन दिवस पाणी होते. नदीतीरावरील गावांमध्ये महापुराचे पाणी शिरले होते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने ४४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. चौघांचा यात बळी गेला होता.

आता पुन्हा पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. नदीतीरावर असलेल्या गावांमध्ये गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. प्रशासनाने पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर उपाययोजनेसाठी कंबर कसली आहे. सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मात्र यातील बहुतांश गावे वैनगंगेच्या रेड झोनमध्ये येत असून, त्या गावातील घरांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. गोसे प्रकल्पाने बाधित गावांचे पुनर्वसन झाले. परंतु लाखांदूर, पवनी, तुमसर तालुक्यातील नदीतीरावरील गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.

गावआपत्ती व्यवस्थापन आराखडा

महापुराची स्थिती निर्माण होणाऱ्या वैनगंगा नदीतीरासह इतर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. सरपंच, वायरमन, तलाठी, पोलीस पाटील यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी संभाव्य पूरबाधित गावांना भेटी देऊन पाहणी केली. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ही समिती नागरिकांच्या मदतीला सज्ज राहणार आहे.

Web Title: Flood threat in 99 villages on the banks of Wainganga river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर