महाराष्ट्र बँकेच्या तिजोरीत पुराचे पाणी, ४०० काेटींच्या नाेटा खराब?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 11:36 AM2023-11-01T11:36:52+5:302023-11-01T11:37:14+5:30
२३ सप्टेंबर रोजी बसलेल्या पुराच्या तडाख्यात परिणाम : 'आरबीआय'ला कळविली माहिती
नागपूर : २३ सप्टेंबर रोजी नागपूरला पुराचा तडाखा बसला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पुराचे पाणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सीताबर्डी येथील झाेन कार्यालयातही शिरले हाेते, ज्यामुळे बँकेच्या चलन तिजाेरीतील राेकड भिजली व निरुपयाेगी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात अंदाजे ४०० काेटींची राेकड खराब झाल्याची माहिती पुढे आली आहे.
२२ सप्टेंबरच्या रात्री नागपुरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम व मध्य नागपुरातील बहुतेक वस्त्या जलमय झाल्या हाेत्या. २३ सप्टेंबरच्या सकाळी हाहाकार उडाला हाेता. शेकडाे लाेकांच्या घरात पाणी शिरले हाेते आणि पुरात अडकलेल्या अनेकांना बाेटीद्वारे बाहेर काढावे लागले. नागनदीच्या आसपासच्या वस्त्या पुराने वेढल्या हाेत्या. या पुरात नुकसान झाल्याचे पंचनामे अद्यापही सुरू आहेत. यादरम्यान नागनदीच्या काठावरून ५० मीटर दूर असलेल्या महाबॅंकेच्या झाेन कार्यालयातही पुराचे पाणी शिरले हाेते. बॅंकेतून पुराचे पाणी काढण्यासाठी २४ तास लागले. मात्र या पुरामुळे बॅंकेच्या तिजाेरीतील राेकड भिजल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराच्या घटनेनंतर आरबीआयला याबाबत कळविण्यात आले. आरबीआयने खराब झालेल्या नोटा गोळा करण्यासाठी आणि चलन तिजोरी पुन्हा भरण्यासाठी तातडीने तपासणी पथक पाठवले. आरबीआयचे अधिकारी काळजीपूर्वक नोटा मोजतात आणि स्कॅन करतात, ज्या पुन्हा जारी करता येत नाहीत त्या काढून टाकल्या जातात. त्यानंतर, मानक प्रक्रियेनुसार बँकेला नवीन पैसे पाठवले जातात. सूत्राच्या माहितीनुसार बँकेने कागदी चलनातील अंदाजे ४०० कोटी रुपये गमावले आहेत. यासंदर्भात बॅंकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक वैभव काळे यांना विचारले असता, त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.