पुसदा-२ गावात शिरले पुराचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:43+5:302021-07-09T04:07:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सूर नदीच्या पुराचे पाणी पुसदा पुनर्वसन-२ या गावात शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पुराचे पाणी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : सूर नदीच्या पुराचे पाणी पुसदा पुनर्वसन-२ या गावात शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने गृहाेपयाेगी साहित्य भिजल्याने नागरिकांचे माेठे नुकसान झाले. पाऊस व पुरामुळे घरांची पडझड अथवा जीवितहानी झाली नाही.
रामटेक तालुक्यासह पुसदा पुनर्वसन-२ या गावाच्या परिसरात गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यातच सकाळी साडेदहा वाजल्यापासून पावसाचा वेग वाढला आणि मुसळधार पावसामुळे सूर नदीला पूर आला. त्यातच दुपारी १२ वाजल्यापासून पुराच्या पाणीपातळीत वाढ हाेत गेल्याने पुराचे पाणी नदीकाठच्या पुसदा पुनर्वसन-२ या गावात शिरायला सुरुवात झाली.
गावातील प्रत्येक घरात पुराचे पाणी शिरल्याने घरांमधील धान्य, भांडी, गृहाेपयाेगी साहित्य भिजले हाेते. माहिती मिळताच तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी गावाला भेट देऊन पूर परिस्थिती आढावा घेतला. पाऊस थांबल्याने सायंकाळी चार वाजल्यापासून पूर ओसरायला सुरुवात झाली हाेती. गावातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले.