पुराचे पाणी आणि सहा गावांत होते हानी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:15+5:302021-07-27T04:09:15+5:30
शरद मिरे भिवापूर : अतिवृष्टी झाली की प्रत्येकाचेच नुकसान होते. मात्र, तालुक्यातील सहा गावांना सर्वप्रथम पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका बसतो. ...
शरद मिरे
भिवापूर : अतिवृष्टी झाली की प्रत्येकाचेच नुकसान होते. मात्र, तालुक्यातील सहा गावांना सर्वप्रथम पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका बसतो. कारण, नदी-नाल्यांचे पात्र अगदी गावाला लागून असल्यामुळे पुराचे पाणी गावात अन् घरात शिरून अन्न, वस्त्र, निवारा या मानवी गरजा पुराच्या तावडीत सापडतात.
मांगली, नक्षी, चिखलापार, मानोरा, कोलारी, नांद ही सहा गावे पूरपरिस्थितीच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. मांगली व नक्षी ही दोन्ही गावे मरू नदीच्या अगदी काठावर वसलेली आहेत. अनेकांची घरे आणि नदीचे पात्र अगदी लागून आहे. त्यामुळे नदीला पूर आला की, पुराचे पाणी गावात आणि घरात शिरून मोठे नुकसान होते. नांद नदीचे पात्र लहान असल्यामुळे या नदीला क्षणात पूर येतो. याचा फटका नांद, चिखलापार या दोन्ही गावांना बसतो. पूरपरिस्थितीच्या दृष्टिक्षेपात चिखलापार गावाची नोंद पहिल्या स्थानी आहे. आठवडाभरापूर्वीच झालेल्या अतिवृष्टीत चिखलापार येथे मोठे नुकसान झाले आहे. मानोरा व कोलारी या दोन गावांतसुद्धा हीच स्थिती आहे. त्यामुळे पावसाळा लागताच प्रशासनाला तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनासह या सहा गावांवर प्राधान्याने लक्ष ठेवावे लागते. यापूर्वी अनेकदा या गावावर पूरपरिस्थितीचा धोका उद्भवला असून, तालुका मुख्यालयाशी संपर्कसुद्धा तुटला. अशावेळी थातूरमातूर व्यवस्था करत केवळ वेळ काढला गेला. मात्र, एवढ्या वर्षात पूरपरिस्थितीपासून बचावाकरिता शासनाने या सहा गावांत कुठल्याही कायमस्वरूपी योजना आखल्या नाहीत. त्यामुळे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा तर करत नाही ना, असा सवाल आता विचारला जात आहे.
----
गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरचा धोका
वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द पूर्णाकृती होत आहे. तालुक्यातून वाहणारी मरू नदी पुढे या प्रकल्पाला जाऊन मिळते. गत काही वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात जलसाठा वाढून प्रकल्पातील बॅकवॉटरमुळे मरू नदी, चिखली नदी, नक्षी नदीला पूर येतो. अनेकदा या पूरपरिस्थितीमुळे नागपूर-चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा ही राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक ठप्प होते.
महालगाव नदी : हिंगणघाट मार्गावरील वाहतूक ठप्प
नांद, महालगाव, चिखलापार ही गावे जवळपास लागून आहेत. यातील महालगाव नदीला पूर आल्यास थेट उमरेड-हिंगणघाट ही राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प होते. महत्त्वाचे म्हणजे नदीला पूर आल्यानंतर येथे नदीकाठावरील शेतांचे प्रचंड नुकसान होते. पिकांसह शेतजमिनी अक्षरश: खरडून जातात. आठवडाभरापूर्वी सुद्धा असेच विदारक दृष्य येथे पाहायला मिळाले. पुराच्या पाण्यात जनावरेही वाहून गेली.
------
तर चिलखापारचे मोवाड होईल
नांद नदीला पाच ते सहा नद्या मिळतात. हीच नदी पुढे धरणाला मिळते. धरणातील पाण्याची थोप नांद नदीला असते. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवून १९९० पासून आतापर्यंत २३ वेळा चिखलापार गावात पुराचे पाणी शिरले. संबंधित विभागाने २०१२ मध्ये सर्व्ह केला. यात गावातील ७० घरांचे पुनर्वसन करण्याबाबत सुचविले. मात्र, संपूर्ण गाव पाण्याखाली येत असल्यामुळे चिखलापार गावाचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे, अन्यथा एक दिवस चिखलापारचे ‘मोवाड’ झाल्याशिवाय राहणार नाही.
----- भाष्कर येंगळे, सामाजिक कार्यकर्ता, रा. चिखलापार
---------------------------------------------
पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास आमच्या गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा असतो. त्यामुळे दुसऱ्या गावाशी संपर्क तुटतो. अगदी नदीच्या काठावर गाव वसलेले आहे. त्यामुळे भविष्यात मोठी हानी होऊ शकते. यातून बचावासाठी संपूर्ण गावाचे पुनर्वसन हा एकमेव पर्याय आहे. याबाबत आम्ही अनेकदा शासन व प्रशासनाला निवेदन दिले आहे.
------------ देवराव जगथाप, माजी सरपंच रा. मांगली