दीक्षाभूमीवरील ज्ञानसंपादनाचा प्रवाह थांबला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:25+5:302021-04-14T04:08:25+5:30
नागपूर : दीक्षाभूमी म्हणजे अखंड वाहणारा ज्ञानाचा झरा. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या विज्ञानाचा प्रकाश या भूमीतून वंचितांच्या ...
नागपूर : दीक्षाभूमी म्हणजे अखंड वाहणारा ज्ञानाचा झरा. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या विज्ञानाचा प्रकाश या भूमीतून वंचितांच्या झाेपडीपर्यंत पेरला आणि काेट्यवधींचे तिमीर दूर झाले. बाबासाहेब म्हणजे पुस्तकांमुळे प्रकाशित झालेले ज्ञानसूर्य हाेते. ही प्रेरणा त्यांच्या अनुयायांमध्येही रुजली. जगात कुठेही हाेत नसेल एवढी पुस्तकांची उलाढाल येथे हाेते. मात्र, गेल्या दाेन वर्षांपासून ज्ञानसंपादनाच्या या प्रवाहाला काेराेनाची नजर लागली आहे. गेल्या वर्षीही महामानवाच्या जयंती उत्सवासह एकही कार्यक्रम होऊ शकला नाही आणि यावेळीही तीच अवस्था आहे. त्यामुळे साहित्य प्रकाशक, विक्रेते आणि अनुयायीही निराश आहेत.
धम्मदीक्षा साेहळा असाे, जयंती असाे की, महामानवाचे महापरिनिर्वाण दिन, पुस्तकांचे शेकडाे दुकाने दीक्षाभूमीवर लागलेली असतात. दुर्मीळ असे बाैद्ध आंबेडकरी साहित्यच नाही तर बहुजन समाजातील क्रांतिनायकांचे दुर्मीळ साहित्य हमखास मिळण्याचे हे प्रेरणास्थळ हाेय़. त्यामुळे जगभरातील पुस्तकप्रेमी आशेने दीक्षाभूमीवर येतात. मात्र, काेराेनाने ही सर्व पावले राेखली आहेत. त्यामुळे पुस्तकरूपी ज्ञानाचा प्रवाह खंडित झाला आहे. ही खंत प्रत्येकाच्या मनात आहे.
ही खरच दु:खदायी गाेष्ट
दीक्षाभूमीवर हाेणारा काेणताही उत्सव हा पुस्तक उत्सवच असताे. येथे येणारे लाखाे अनुयायी काही नाही; पण एक तरी पुस्तक घरी घेऊन जातात. मात्र, दाेन वर्षांपासून हे सारेच थांबले आहे. त्यामुळे बाैद्ध, आंबेडकरी साहित्याची निर्मिती करणारे प्रकाशक निराश आहेत आणि यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे छाेटे विक्रेता काेलमडले आहेत. ज्ञान प्रवाहच नाही तर आर्थिक प्रवाहही थांबला आहे.
- नरेश वाहाने, पुस्तक विक्रेता
पुस्तक विक्रेते देशाेधडीला
दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाला किमान ५ लाखांची पुस्तके विकली जातात. धम्मक्रांती साेहळ्यात हा व्यवसाय ५ काेटींच्या वर जाताे. त्यामुळे बहुजन साहित्य निर्मिती करणाऱ्या प्रकाशक व विक्रेत्यांसाठी ही नवसंजीवनी असते. प्रकाशकांचे वेगळे व विक्रेत्यांचे वेगळे स्टाॅल लागलेले असतात. मात्र, काेराेनामुळे सर्व व्यवस्था काेलमडली आहे. शेकडाे विक्रेते आहेत, ज्यांच्या कुटुंबाचा गाडा यावरच आहे. मात्र, ते सर्व देशाेधडीला लागले आहेत.
- सुजित मुरमाडे, अध्यक्ष, बाैद्ध आंबेडकरी साहित्य विक्रेता वेलफेअर असाेसिएशन
दुर्मीळ पुस्तकांचा प्रवाह थांबला
येथे केवळ आंबेडकरी साहित्यच नाही तर बहुजन समाजाच्या अवस्था, व्यवस्था व क्रांतिनायकांची पुस्तके येथे मिळतात. भारतासह जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेची ओळख दीक्षाभूमीवर पुस्तकांच्या माध्यमातून हाेते. त्यामुळेच जगभरातील हजाराे अनुयायांची केवळ पुस्तकांसाठी दीक्षाभूमीकडे ओढ लागलेली असते. मात्र, दाेन वर्षांपासून दुर्मीळ पुस्तकांचा प्रवाहच थांबला आहे.
- हरीश वंजारी, निवृत्त अभियंता व दुर्मीळ बहुजन साहित्य विक्रेते
पुस्तके धूळखात, नवीन प्रकाशन थांबले
आंबेडकरी अनुयायांचे पुस्तकप्रेम अवर्णनीय आहे. केवळ दीक्षाभूमीवरील कार्यक्रमच थांबले असे नाही तर आंबेडकरी चळवळीअंतर्गत आयाेजित हाेणारे सर्व कार्यक्रम बंद पडले आहेत. अशा प्रत्येक कार्यक्रमात पुस्तकांची दुकाने लागलेली व विक्री ठरलेली असायची. यावर्षी तरी जयंती उत्सवाला पुस्तकांना मागणी येईल म्हणून विक्रेत्यांनी ती आणली हाेती; पण ती आता धूळखात पडली आहेत. नवीन प्रकाशने बंद झालेली आहेत. आंबेडकरी साहित्याने बहुजन साहित्यालाही उचलून धरले आहे. मात्र, हे सर्व आता थांबल्यासारखे झाले आहे़