दिवाळीत फुलांना ‘फुल्ल’ भाव; झेंडू १००, शेवंती २५०, गुलाब ३०० रुपये!
By मोरेश्वर मानापुरे | Published: November 11, 2023 05:36 PM2023-11-11T17:36:16+5:302023-11-11T17:37:00+5:30
लक्ष्मीपूजनाला भाव वाढणार : पूजा व सजावटीच्या फुलांची आवक वाढली
नागपूर : दसरा ते दिवाळीपर्यंत पूजेच्या फुलांना जास्त मागणी असते. दसरा आणि दिवाळीच्या तीन दिवसांत फुलांची जास्त विक्री होते. सध्या सीताबर्डी येथील नेताजी मार्केटमधील ठोक बाजारात शनिवारी झेंडू १००, शेवंती २५० आणि सर्व प्रकारच्या गुलाबांची ३०० ते ४०० रुपये किलो दराने विक्री झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूचे भाव मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून राहील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
नागपूर जिल्हा आणि राज्याच्या अन्य भागांतून पूजेची आणि सजावटीच्या फुलांची आवक वाढली आहे. शुक्रवार आणि शनिवारी झेंडू, शेवंती आणि सर्व प्रकारच्या गुलाबाची जवळपास २०० गाड्यांची (एक गाडी दीड टन) आवक झाली. सकाळी झेंडू ९० ते १०० रुपये, शेवंती २०० ते २५० रुपये आणि गुलाबाचे भाव ३०० ते ५०० रुपयादरम्यान होते. रविवारीही सर्व प्रकारच्या फुलांच्या २०० गाड्यांची आवक राहण्याची शक्यता आहे.
नेताजी मार्केट ठोक फूल बाजाराचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, फुलांची सर्वाधिक विक्री दिवाळीच्या तीन दिवसांत होते. यंदा पावसाने साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांना फुलाचे चांगले पीक झाले आहे. मागणी वाढल्याने उत्पादक उत्साही आहेत. झेंडूमध्ये लोकल, कोलकाता, नवरंग माल येत आहे. शेवंतीच्या ५ गाड्या विक्रीसाठी आल्या. प्रारंभी भाव २०० रुपयांपर्यंत तर नंतर भाव २५० रुपये किलोवर पोहोचले.
देशी, हैदराबादी, शिरडी, डच आणि डिवाईन गुलाबाचे भाव ३०० ते ४०० रुपये किलो होते. थंडीमुळे निशिगंधा फुलांची आवक कमी असल्याने भाव ४५० ते ५०० रुपये किलो होते. याशिवाय कुंदा फुलांच्या माळा (जास्मीन प्रकार, सोबत गुलाब) किलोनुसार ५०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव आहेत. तसे पाहता दसऱ्यापेक्षा दिवाळीत फुलांची मागणी कमी असते. केवळ घर सजावट आणि पूजेसाठी फुले लागतात. व्यापारी पंचमीला पूजा करीत असल्याने त्या दिवशी मागणी वाढते. सर्व फ्रेश माल येत आहे.
नागपूर जिल्हा व मध्य प्रदेशातून आवक
नागपूर जिल्ह्याच्या ७० ते ८० किमी परिसरातून माल विक्रीसाठी येत आहे. तसेच बेंगळुरू, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथून १२ ते १५ गाड्यांची (एक गाडी ३ ते ४ टन) आवक आहे. या तुलनेत स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांचा माल जास्त प्रमाणात येत आहे. दिवाळीच्या दिवसात चोहोबाजूने फुलांची आवक आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत असून ते आनंदी असल्याचे रणनवरे यांनी सांगितले.
ठोक बाजारात फुलांचे भाव (किलो)
झेंडू ९० ते १०० रुपये
(लोकल, कोलकाता, नवरंग)
शेवंती २०० ते २५० रुपये
गुलाब ३०० ते ४०० रुपये
(देशी, हैदराबादी, शिर्डी, डच)
निशिगंधा ५०० रुपये