सजावटीची फुले यंदा स्वस्त; लग्नकार्यात मागणी वाढली
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 22, 2023 06:54 PM2023-05-22T18:54:13+5:302023-05-22T18:54:42+5:30
Nagpur News यंदा सजावटीच्या फुलांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत. त्यामुळे यंदा खऱ्या फुलांच्या सजावटीवर लोकांचा भर आहे.
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : वेडिंग डेकोरच्या थीममध्ये स्टेज, हॉल वा लॉनची सजावट फुलांनी करण्याची क्रेझ वाढत आहे. स्टेजची सजावट शैलीला अनुरूप आणि ग्लॅमर वाढविणारी असते. त्यामुळे फुलांच्या सजावटीवर वर-वधूंसह संपूर्ण कुटुंबीयांचा भर असतो. यंदा सजावटीच्या फुलांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत. त्यामुळे यंदा खऱ्या फुलांच्या सजावटीवर लोकांचा भर आहे.
लग्नात स्टेज केंद्रस्थानी असतो. सजावटीच्या निमित्ताने कायमस्वरुपी आठवणी या प्रसंगी तयार केल्या जातात. यंदा सजावटीच्या फुलांचे दर आटोक्यात असल्यामुळे लोकांच्या खिशाला झळ पोहोचणार नाही. अर्थात काटकसर करावी लागणार नाही. तपत्या उन्हामुळे फुले टिकत नाहीत वा टवटवीत होत नसल्याची शेतकऱ्यांची चिंता आहे. यंदा पॉलिहाऊसमध्ये उत्पादन वाढले आहे.
सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात मागणी
कटफ्लॉवर अर्थात सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारे जरबेरा, डच गुलाब, कार्नेशन, आर्किड, लिलियममध्ये आशियाटिक, ओरिएन्टल, जिप्सोफिलिया, गोल्डन रॉड या फुलांना उन्हाळ्यात जास्त मागणी असते. ही फुले स्थानिक उत्पादकांसह बेंगळुरू येथून मोठ्या प्रमाणात नागपुरातील फुलांची मुख्य बाजारपेठ सीताबर्डी नेताजी फूल मार्केटमध्ये विक्रीसाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विक्रेते नोंदणी करूनच फुलांची विक्रीसाठी मागणी करीत असल्याची माहिती नेताजी फूल मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी दिली.
दररोज २५ लाखांची उलाढाल
उन्हाळ्यात सजावटींच्या फुलांची उलाढाल दररोज २५ लाखांपेक्षा जास्त होते. या दिवसात लग्नकार्याचे सजावटीचे ऑर्डर येतात. त्यानुसार बेंगळुरू, मुंबई आणि पुणे येथून फुले मागवावी लागतात. सध्या खऱ्या फुलांनी सजावट करण्याची क्रेझ वाढत असल्यामुळे व्यवसायात वाढ झाल्याचे रणनवरे यांनी सांगितले.
स्थानिकांसह बेंगळुरू, मुंबई, पुणे येथून आवक
फूल बाजारात नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बेंगळुरू, मुंबई, पुणे येथून पूजेची आणि सजावटीच्या फुलांची आवक होते. सध्या सांगली, सातारा, संगमनेर, अहमदनगर, हैदराबाद, अमरावती, अकोला, छिंदवाडा या भागातूनही फुले विक्रीसाठी येत आहेत. पॉलीहाऊसमधून सजावटीची फुले उत्पादक आणतात.