उपराजधानीत शेतकऱ्यांनी आणलेली फुले झाली कचरामोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:26 AM2020-05-30T11:26:24+5:302020-05-30T11:38:31+5:30
एकीकडे शेतातील उमललेली फुले सुकत चालली आहेत तर दुसरीकडे बाजारात विक्रीसाठी परवानगी मिळत नाही. धाडस करून काही शेतकऱ्यांनी त्यांचा माल सीताबर्डीच्या फुलमार्केटमध्ये आणला तेव्हा महापालिका व पोलिसांनी फुलांचे गठ्ठे कचराकुंडीत फेकून दिले.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना टाळेबंदीत मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे शेतातील उमललेली फुले सुकत चालली आहेत तर दुसरीकडे बाजारात विक्रीसाठी परवानगी मिळत नाही. धाडस करून काही शेतकऱ्यांनी त्यांचा माल सीताबर्डीच्या फुलमार्केटमध्ये आणला तेव्हा महापालिका व पोलिसांनी फुलांचे गठ्ठे कचराकुंडीत फेकून दिले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून अनेकांनी शेतातील फुलझाडेच उपटून फेकली आहेत. दुसरीकडे मार्केटमधील फुलविक्रेते आर्थिक संकटाला तोंड देत दिवस काढत आहेत.
कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि सर्व ठप्प झाले. दरम्यान, तिसरा आणि चौथा लॉकडाऊन होता होता निर्बंधात शिथिलता अली आणि अनेक व्यवसाय सुरू झाले. तेव्हा फुलविक्रीला परवानगी मिळावी म्हणून व्यापारी आणि शेतकरी विनंती करीत आहेत. नागपूर शहराच्या ५० किलोमीटरच्या आसपास अडीच हजारावर शेतकरी फुलांची शेती करतात. गुलाब, जाई, झेंडू आदी फुलांची शेती होते. सकाळी उठून फुले तोडायची आणि ७.३० ते ८ वाजतापर्यंत मार्केटला आणायची, असा दिनक्रम. पण दोन महिन्यांपासून सर्व ठप्प झाले आहे. लॉकडाऊन-४ संपत आलाय आणि पाचवा लागण्याची स्थिती आहे. अशात फूल व्यवसायाची मुभा द्यावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे १५-२० शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी सीताबर्डी मार्केटमध्ये फुलांचे गठ्ठे आणले. मात्र पोलीस आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांनी गठ्ठ्यातील सर्व फुले कचराकुंडीत फेकून दिली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी डोक्यावर हात ठेवत परतीचा रस्ता धरला. राजू गोरे (खापरी), कपिल काकडे (गिरोला), सुधाकर खोडे (खैरी पन्नासे), प्रदीप सातपुते (पाटणसावंगी), सुनील मांडवकर (जलालखेडा) आदी शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. सरकारने एकतर आर्थिक मदत घ्यावी किंवा विक्री तरी करू द्यावी, अशी विवंचना त्यांनी लोकमतशी बोलताना केली.
फुलविक्रेतेही त्रस्त
दुसरीकडे फुलांची विक्री करणारे व्यापारीही टाळेबंदीत त्रस्त झाले आहेत. सीताबर्डीच्या फुलविक्रेता संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय इंगळे यांनी विक्रेत्यांची परिस्थिती मांडली. बाजारात १०० व्यापारी फुलांचा व्यवसाय करतात. प्रत्येकाजवळ ५-६ माणसे आहेत. दोन हजार लोकांचा रोजगार फुलविक्रीवर आहे. शिवाय शहरातील ४००० वर फुलविक्रेते या मार्केटच्या भरवशावर आहेत. यातील अनेकांवर उपासमारीची परिस्थिती आली आहे. पोलीस आणि मनपा कर्मचारी माल उचलून कचºयात फेकून देतात. अशावेळी आम्ही काय करायचे? दोन महिने परिस्थिती सांभाळली पण आता परिस्थिती परीक्षा घेत असून सांभाळणे मुश्कील होत असल्याची भावना इंगळे यांनी व्यक्त केली.
फुलविक्रेते आणि मजुरांची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. दोन महिने सांभाळले, आता कठीण होत आहे. त्यामुळे महापालिकेने नियम लावून आम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. आम्ही सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन आपला व्यवसाय करू. परवानगी देत नसेल तर सरकारने विक्रेते व मजुरांना आर्थिक मदत करावी.
- दत्तात्रय इंगळे, उपाध्यक्ष, फुलविक्रेता संघ, सीताबर्डी