अंधारलेल्या आयुष्यात फुलविली यशाची फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:39 AM2019-05-29T10:39:05+5:302019-05-29T10:39:35+5:30
अपंगत्वाचा बाऊ न करता, त्याच्यावर मात करून सतीश उके या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ७८ टक्के गुण मिळवीत दिव्यांगांच्या श्रेणीत अव्वल आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपंगत्वाचा बाऊ न करता, त्याच्यावर मात करून सतीश उके या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ७८ टक्के गुण मिळवीत दिव्यांगांच्या श्रेणीत अव्वल आला आहे. सतीशला अपंगत्वाचा सामना करताना परिस्थितीवरही मात करावी लागली.
मूळचा भंडारा जिल्ह्यातील चिचगाव येथील राहणारा सतीश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. सतीश तीन वर्षाचा असताना वडिलांचे निधन झाले. तीन लेकरांचा सांभाळ करण्यासाठी आई अंगणवाडी सेविका म्हणून कामाला लागली. मुलगा मोठा होऊन कुटुंबाचा आधार होईल, अशी भाबडी अपेक्षा आईची होती. पण सतीश चौथ्या वर्गात मोबाईलसोबत खेळता खेळता स्फोट झाला आणि त्याचे दोन्ही डोळे निकामी झाले. सामान्य सतीश दिव्यांग झाला. सामान्य शाळेत जाणाऱ्या सतीशला नियतीने दिव्यांगाच्या शाळेत पाठविले. १० वर्षाचा असताना सतीश आईपासून दूर झाला. नागपुरातील अंध विद्यालयात त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढच्या शिक्षणासाठी त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. चोखामेळा वसतिगृहात त्याला निवारा मिळाला. समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येणाºया शैक्षणिक भत्त्यात तो आपल्या गरजा भागवीत होता. दिव्यांग असताना आईला कधी त्रास दिला नाही. शैक्षणिक भत्त्यातून शालेय साहित्य खरेदी केले. नियमित वर्ग केले. अभ्यासात चिकाटी ठेवली आणि कला शाखेतून दिव्यांग प्रवर्गात अव्वल आला. पुढे शिक्षण घेऊन त्याला लवकरात लवकर कुटुंबाचा आधार बनायचे आहे.