चढतोय घसरतोय..

By admin | Published: January 7, 2015 01:03 AM2015-01-07T01:03:57+5:302015-01-07T01:15:49+5:30

गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला

Fluctuating .. | चढतोय घसरतोय..

चढतोय घसरतोय..

Next

पाऱ्याला नाही थारा
नागपूर : गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला पारा २४ तासांत अपेक्षेहून कमी तापमानापर्यंत पोहोचत आहे. मंगळवारी नागपुरात ६.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे सोमवारी किमान पारा १२.९ अंश सेल्सिअस इतका होता. दर दिवशी वातावरणात चढउतार होत असल्याने हवामानतज्ज्ञ चकित झाले आहेत.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे २०१५ या वर्षातील सुरुवातीचे दोन दिवस पावसात गेले. तत्पूर्वी २९ डिसेंबर रोजी ४५ वर्षांतील सर्वात कमी इतक्या ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मध्यंतरी रात्रीचा गारठा थोडा कमी झाला होता व सरासरी १७ अंशांपर्यंत किमान पारा गेला होता. मात्र ढगाळ वातावरण दूर झाल्याने बोचरे वारे वाहण्यास परत सुरुवात झाली आहे.
मंगळवारी दिवसभर शहरात बोचरे वारे वाहत होते. सोमवारी किमान १२.९ अंशांवर असणारा किमान पारा मंगळवारी अचानक ६.६ अंशांपर्यंत खाली घसरला. किमान तापमान सरासरीहून ६ अंशांनी कमी होते.
मध्यप्रदेश, छत्तीसगड व विदर्भात थंड व कोरडे वारे वाहू लागले आहेत. शिवाय उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत शीतलहर कायम राहील व पारा आणखी घसरू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fluctuating ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.