नागपूर ग्रामीण भागात टंचाई निवारण्यासाठी पहिल्यांदाच होणार बोअरवेलचे फ्लशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:26 PM2020-05-23T21:26:12+5:302020-05-23T21:29:24+5:30
ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. भूगर्भात पाणी असो किंवा नसो, बोअरवेल खोदणे हाच पर्याय पदाधिकाऱ्यांना दिसतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेने ८६०० बोअरवेल खोदल्याची नोंद आहे. बोअरवेलमुळे भूगर्भातील पाणी साठा कमी होत असल्याने यावर्षी पहिल्यांना जि.प.ने टंचाई आराखड्यात नवीन बोअरवेलपेक्षा फ्लशिंगवर जास्त फोकस केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. भूगर्भात पाणी असो किंवा नसो, बोअरवेल खोदणे हाच पर्याय पदाधिकाऱ्यांना दिसतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेने ८६०० बोअरवेल खोदल्याची नोंद आहे. बोअरवेलमुळे भूगर्भातील पाणी साठा कमी होत असल्याने यावर्षी पहिल्यांना जि.प.ने टंचाई आराखड्यात नवीन बोअरवेलपेक्षा फ्लशिंगवर जास्त फोकस केले आहे. यंदा ६५० बोअरवेलच्या फ्लशिंगचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
फ्लशिंग म्हणजे बंद पडलेल्या बोअरवलेला रिचार्ज करून वापर करणे. नवीन बोअर खोदण्यापेक्षा फ्लशिंगला कमी खर्च लागतो. अनेकदा पाणी पुरवठा विभागाने फ्लशिंगचा प्रस्तावही पदाधिकाऱ्यांकडे ठेवला, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यंदा प्रथमच जिल्ह्यातील टंचाईच्या कामात ६५० बोअरवेलच्या फ्लशिंगला मंजुरी दिली आहे. यामुळे जुन्या बोअरवेल पुन्हा पुनर्जीवित होऊन, त्याचा ग्रामीण नागरिकांना फायदा होणार आहे. टंचाई आराखड्याच्या झालेल्या आढवा बैठकीत निरुपयोगी बोअर निर्लेखित करणे, जिल्ह्यात बोअरवेलचे प्रमाण कमी करणे, ज्या गावात पाण्याचे स्रोत बाधित आहे, त्याचा अभ्यास करुन फिल्टर प्लँट (आरओ) प्रस्तावित करणे आदी सूचना देण्यात आल्या. ज्या कंत्राटदाराने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण केली नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही निर्देश वरिष्ठांनी दिले. यंदा टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात १०७२ गावांमधील कामासाठी ३७ कोटी ८० लक्ष रुपये प्रस्तावित आहेत.