मेट्रो रेल्वेच्या मार्गाजवळ पतंग उडविल्यास होऊ शकते दुर्घटना; संक्रातीला काळजी घ्या
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 10, 2024 07:19 PM2024-01-10T19:19:17+5:302024-01-10T19:20:25+5:30
पतंगप्रेमींनी काळजी घ्यावी
नागपूर : पतंग उडवण्याचा उत्सव म्हणजे जानेवारीचा महिना. यादरम्यान संपूर्ण आकाश पतंगमय झाले असते. पण पतंगीचा हा उत्सव साजरा करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. मेट्रो ट्रेनचे संचालन विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होतो. पतंग किवा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते तसेच ट्रेनचे संचालन होण्यास अडथळा निर्माण होऊ शकते. त्यामुळे पतंगप्रेमींनी पतंग उडविताना काळजी घ्यावी, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.
मेट्रो ट्रेनच्या संचालनात अडथळा निर्माण झाल्यास मेट्रो प्रवास लांबू शकतो. त्यामुळे युवक आणि नागरिकांनी मेट्रो रेल्वे मार्गाजवळ पतंग उडवू नये. शिवाय पतंग व मांजा अडकल्याने मेट्रो सेवा प्रभावित होणार नाही, याची काळजी घ्यावी. मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दर १५ मिनिटांनी आणि गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी उपलब्ध आहे. महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ऑरेंज लाईन मेट्रो स्टेशन आणि पुढे मिहान डेपोपर्यंत तसेच अॅक्वा लाईन मार्गावर सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर आणि पुढे हिंगणा डेपोपर्यंत मेट्रो ट्रेनचे संचालन सुरू असते.