आता मिहानमध्ये होणार फ्लाईंग क्लब : एमएडीसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:06 AM2019-11-20T00:06:29+5:302019-11-20T00:08:10+5:30
उपराजधानीतील सरकारी फ्लाईंग क्लबला आता मिहानमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. फ्लाईंग क्लबचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मंजूर केला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील सरकारी फ्लाईंग क्लबला आता मिहानमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. फ्लाईंग क्लबचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मंजूर केला असून त्या अंतर्गत फ्लाईंग क्लबला एअर इंडिया एमआरओलगत पाच एकर जमिनीला ११ नोव्हेंबरला मान्यता देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिक उड्डयण संचालनालयाच्या मानकानुसार नवीन फ्लाईंग क्लबला किमान पाच एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे क्लबने हा प्रस्ताव एमएडीसीला दिला होता. नवीन जागेवर आधुनिक व मोठ्या हँगरच्या फ्लाईंग क्लबची निर्मिती होणार आहे. तसे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्यामुळे या जागेवर विद्यार्थ्यांसाठी होस्टेल तयार करण्यात येणार वा नाही, याचा खुलासा झाला नाही. माहितीनुसार या जागेवर होस्टेल तयार झाल्यास फ्लाईंग क्लबला जास्त प्रतिसाद मिळेल.
नागपूरचा फ्लाईंग क्लब ७३ वर्ष जुना असून संचालन गेल्या ३० वर्षांत अनेकदा बंद राहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून क्लबचे संचालन बंद आहे. याकरिता चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरची नियुक्ती झालेली नाही. या कारणामुळे विमानांसाठी डीजीसीएकडून मिळालेले परवानगी रद्द झाली आहे. आता फ्लाईंग क्लबला नवीन प्रक्रियेनुसार परवानगी मिळवावी लागेल.