विमानाने जाणे, रेल्वेने परतणे
By admin | Published: October 21, 2016 02:49 AM2016-10-21T02:49:52+5:302016-10-21T02:49:52+5:30
अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी
नागपूर : अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोकेनच्या तस्करीत सहभागी असणाऱ्यांना अटक करण्यासाठी बुधवारी रात्री ठिकठिकाणी सापळे लावले. त्यात सचिन अडकला. बबलूलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतर बबलू शेखचे अपहरण झाल्याची वार्ता जाणीवपूर्वक पसरवण्यात आली. काहींनी कोडवर्ड वापरून बबलूला कोकेन प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे संबंधितांना मेसेज दिले. त्यामुळे अनेकांनी नागपुरातून पळ काढला. कोकेनची खेप घेण्यासाठी नागपुरात आलेल्या गोंदियाच्या तस्कराने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला.
लोकमतला संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्रीफर-ब्रजेश हे मुंबईतून कोकेन तस्करी करतात. त्यांच्याकडे ठिकठिकाणच्या कोकेन तस्करांना आणि शौकिनांना माल पुरविण्यासाठी वेगवेगळे कुरियर आहेत. त्यातील एक कुरियर म्हणून सचिन होय. तो नागपुरातील मागणीनसुार, महिन्यातून दोन वेळा मुंबईला जातो. विमानाने जाणे आणि कोकेन घेऊन रेल्वेने परत येणे. त्यानंतर ज्यांनी आॅर्डर नोंदवली. त्यांच्यापर्यंत कोकेन पोहचविणे, अशी सचिनची भूमिका आहे. त्यासाठी प्रत्येक ग्राहकाकडून त्याला ३ ते ४ हजार रुपये आणि एका खेपेसाठी स्रीफर-ब्रजेशची जोडगोळी १० हजार रुपये देते. प्रवासाचा खर्च ही जोडगोळीच करते. एका खेपेत आठ ते दहा कोकेन विक्रेते आणि शौकिनांचा माल असतो. अर्थात सचिनला एका खेपेसाठी ३० ते ४० हजार रुपये मिळतात.
बुकी, बार डान्सर आणि अकाऊंट
सचिनसोबत कुरियर म्हणून एका बार डान्सरचे नाव पुढे आले आहे. एमआयडीसीत तिच्या नावाची जोरदार चर्चा आहे. कोकेन पिणाऱ्यांमध्ये बुकी आणि जुगार खेळणाऱ्यांचा जास्तीत जास्त समावेश आहे. कोकेनमुळे माणसाला लवकर झोप येत नाही. त्याच्या ‘शारीरिक शक्ती‘तही कोकेनमुळे वेगळी भर पडते. त्यामुळे रात्रभर जागरण करण्याची सवय जडलेले बुकी, जुगारी अन् डान्सबारमध्ये जाणारे कोकनचा शौक करतात. त्यांचे बार डान्सरच्या माध्यमातून स्रीफर-ब्रजेशशी संबंध आहेत. ते तिच्याच माध्यमातून कोडवर्डवर कोकेनची आॅर्डर नोंदवतात. त्यानंतर संबंधित अकाऊंटमध्ये रक्कम जमा केली जाते. ही रक्कम जमा झाल्यानंतर संबंधितांना कोकेनची डिलिव्हरी मिळते. गेल्या आठड्यात काही बुकी एमआयडीसीच्या एका बारमध्ये कोकेन आणि पांढरे पावडर पीत बसले होते. मात्र, पोलीस येणार ही माहिती कळताच तेथून बुकींनी पळ काढला होता.