मनपा शाळांची खेळातील कामगिरी सुधारण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:55 AM2017-07-18T01:55:14+5:302017-07-18T01:55:14+5:30
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्र ीडा क्षेत्रात मोठी झेप घेता यावी, ...
क्रीडा सभापती : मुख्याध्यापक आणि शारीरिक शिक्षकांची जाणून घेतली मते
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्र ीडा क्षेत्रात मोठी झेप घेता यावी, यासाठी शारीरिक शिक्षण तज्ज्ञांच्या सहकार्याने कामगिरी सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचा मानस मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात मनपा शाळांचे मुख्याध्यापक आणि शारीरिक शिक्षकांची बैठक मनपा मुख्यालयात सोमवारी झाली. बैठकीला सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्र ीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, झोन सभापती संजय चावरे, नगरसेवक सुनील हिरणवार, प्रदीप पोहाणे, दिनेश यादव, नगरसेविका नेहा वाघमारे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, क्र ीडा निरीक्षक नरेश चौधरी, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर उपस्थित होते.
मनपाच्या अनेक शाळांना मैदाने नाहीत. जिथे मैदान आहेत त्या मैदानाचे सपाटीकरण नाही, जिथे उत्कृष्ट मैदान आहे त्या शाळांत शारीरिक शिक्षण शिक्षक नाहीत. त्यामुळे मनपा शाळांतील क्र ीडा विभागाचा आलेख उंचवायचा असेल तर मूलभूत सोयी असणे गरजेचे आहे.ज्या शाळांना मैदाने नाहीत त्या शाळांमध्ये कॅरम, बुद्धिबळ अशा खेळांसाठी चांगले प्रशिक्षक उपलब्ध करून दिल्यास किमान इन्डोअर गेममध्ये विद्यार्थ्यांना निपुण करता येईल, अशीही सूचना शिक्षकांनी केली. काही शिक्षकांनी मनपाची स्पोर्टस् स्कूल यशवंत स्टेडियम येथे सुरू करण्याची सूचना केली तर काहींनी वार्षिक क्रीडा कॅलेंडर तयार करण्याचे आवाहन केले.
‘महापौर चषका’अंतर्गत विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मनपा शाळांचा सहभाग वाढविण्याची सूचना दिलीप दिवे यांनी केली. संदीप जोशी यांनी नव्या जोमाने काम करण्यास सज्ज होण्याचे आवाहन केले.
आज क्र ीडा संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक
मनपाद्वारा होणाऱ्या क्र ीडा स्पर्धा आयोजनासाठी विविध क्र ीडा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे मत घेण्यासाठी आज मंगळवार १८ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता मनपा मुख्यालयात पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सहारे यांनी केले आहे.