नागपुरातील मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष्य केंद्रित : तुकाराम मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 11:41 PM2020-08-06T23:41:53+5:302020-08-06T23:43:16+5:30
नागरिकांनी नियमांचे पालन केले. आपल्या जीवाची काळजी घेतली. अशा ठिकाणी कोरोना संसर्ग कमी झाला आहे. मात्र नागपूर शहरात मागील काही दिवसात कोरोनाबाधिताची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. याचा विचार करता शहरातील मृत्यू कमी करण्यावर मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांनी नियमांचे पालन केले. आपल्या जीवाची काळजी घेतली. अशा ठिकाणी कोरोना संसर्ग कमी झाला आहे. मात्र नागपूर शहरात मागील काही दिवसात कोरोनाबाधिताची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. याचा विचार करता शहरातील मृत्यू कमी करण्यावर मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली.
प्रत्येकाने आपली लाईफ स्टाईल बदलावी लागेल हा बदल केला तरच संसर्ग रोखला जाईल. लॉकडाऊनची प्रशासनाला गरज भासणार नाही. नागरिकांनी नियम पाळले नाही व परिस्थिती आटोक्यात आली नाही, अशा परिस्थितीत लॉकडाऊन लावायचाच झाला तर तो दिवसाचा लावला जाईल.
सुरुवातीला शहरात कन्टेन्मेंट झोनची व्याप्ती मोठी होती. मिशन बिगेन अंतर्गत आर्थिक व्यवहार सुरू झाल्यानंतर व्याप्ती कमी करण्यात आली. तसेही कन्टेन्मेंट झोनच्या दृष्टीने मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. पोलीस कर्मचारी उपलब्ध होत नाही. त्यांच्यावर दुसरीही जबाबदारी आहे. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात सील न करता फक्त गल्ली सील केली जात आहे. संबंधितांना होम क्वारंटाईन केले जात आहे.
मनपा रुग्णालय यावरील खर्च योग्यच
नागपूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, महापालिकेची पाच रुग्णालये अद्ययावत करण्यात आलेली आहेत. गरज भासल्यास येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा विचार आहे. इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली रुग्णालयात सामान्य रुग्णांवर उपचार सुरू आहे. येथे करण्यात आलेला खर्च वाया गेलेला नाही. तो योग्यच असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
राधास्वामी सेंटर येथे फक्त गाद्यांवर खर्च
केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळ येथे कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. येथे ५०० बेडची व्यवस्था केली. यात फक्त महापालिकेने बेडवरील खर्च केलेला आहे. गरज भासेल तेव्हा आवश्यक व्यवस्था केली जाईल. येथील पलंग गाद्या अन्य कोविड सेंटरमध्ये वापरल्या जात आहेत.
ऑड -इव्हन दिशानिर्देश योग्यच
संसर्ग रोखण्यासाठी व्यवसायिकांना दुकाने व प्रतिष्ठाने ऑड - इव्हन नुसार उघडण्यास निर्देश दिले आहे हा निर्णय योग्य आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स पाळावे मास्कचा वापर करावा असे वेळोवेळी आवाहन केले आहे, असेही मुंढे म्हणाले.