जिल्हात धुमशान; भिवापूर तालुक्यात विक्रमी १२८.१ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:20+5:302021-09-22T04:09:20+5:30
नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात ३२ मिमी तर भिवापूर तालुक्यात सकाळी केवळ चार ...
नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात ३२ मिमी तर भिवापूर तालुक्यात सकाळी केवळ चार तासात १२८.१ मिमी अशा उच्चांकी पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली असून येलो अलर्ट दिला आहे.
भिवापूर तालुक्यात पहाटे ४ ते सकाळी ७.३० या काळात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अवघ्या काही तासातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. कुही आणि रामटेक तालुक्यातही अतिवृष्टीची नोंद आहे. कुहीमध्ये ५७.३ मिमी तर रामटेकमध्ये ४६.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. या तुलनेत काटोल, नरखेड, सावनेर आणि कळमेश्वर या चार तालुक्यात मात्र कमी पाऊस पडला. हवामान विभागाने बुधवारी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह वीज व अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
नागपुरात सकाळी ९ वाजतानंतर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सुमारे दोन ते अडीच तासात ३२ मिमी पावसाची नोंद झाली. किमान तापमान २७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आर्द्रता सकाळी ८ वाजता ९६ टक्के तर सायंकाळी ९० टक्के होती.
...
खबरदारीचे आवाहन
मागील तीन दिवसातील पावसामुळे जिल्ह्यातील धरणाची पातळीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्यास केव्हाी दारे उघडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदी काठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
....
मंगळवारचे पर्जन्यमान
नागपूर ग्रामीण : २४.३
कामठी : १७.१
हिंगणा : २५.७
रामटेक : ४६.९
पारशिवनी : १६
मौदा : ३९.९
काटोल : ४.२
नरखेड : २.६
सावनेर : ९.२
कळमेश्वर : ८.९
उमरेड : ३७.८
भिवापूर : १२८.१
कुही : ५७.३
...