नागपूर शहरावर धुक्याची चादर : वातावरणात गारठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 09:11 PM2019-12-26T21:11:15+5:302019-12-26T21:14:40+5:30
वातावरणामध्ये निर्माण झालेल्या बदलामुळे हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. बुधवारच्या रात्री पडलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. यामुळे वातावरणात गारठा पसरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वातावरणामध्ये निर्माण झालेल्या बदलामुळे हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. बुधवारच्या रात्री पडलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. यामुळे वातावरणात गारठा पसरला आहे.
गुरुवारी सकाळी शहरातील वातावरणात मोठ्या प्रमाणावर धुके पसरले होते. बुधवारी रात्री १२.३० वाजतानंतर शहरातील अनेक भागात पाऊस आला. गुरुवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरूच होती. दिवसभर आकाशात ढग असल्याने सूर्यदर्शनही झाले नाही. यामुळे वातावरणामध्ये गारवा वाढला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात हे वातावरण बदलण्याची शक्यता असल्याने थंडी वाढू शकते.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी सागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात यंदा हा बदल जाणवत आहे. उत्तर भारतातून थंड वारे वाहात असल्याने या भागात हलका पाऊस पडत आहे. यापूर्वी बुधवारी सायंकाळीही हलका पाऊस पडला. शुक्रवारनंतर ढगाळी वातावरण दूर होण्याची शक्यता असून त्यानंतर हे वातावरण निवळू शकते. मात्र पश्चिम बंगालकडून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने पुन्हा ३० व ३१ डिसेंबरला अशाच प्रकारचे ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.