लोककलावंतांचा मानच, ‘धन’ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:20 AM2019-07-13T10:20:31+5:302019-07-13T10:22:19+5:30

वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे मानधन योजना राबविली जाते. मात्र सरकारने पैसा नसल्याचे कारण देत हात वर केल्याने या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे.

Folk artists do not have 'wealth'! | लोककलावंतांचा मानच, ‘धन’ नाही!

लोककलावंतांचा मानच, ‘धन’ नाही!

Next
ठळक मुद्देतीन वर्षापासून मानधन थकलेसरकारने केले हात वर वृद्धापकाळातील आधाराला खीळ

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे मानधन योजना राबविली जाते. मात्र सरकारने पैसा नसल्याचे कारण देत हात वर केल्याने या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे. २०१७-१८ मध्ये नव्याने मंजूर झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसह आधीच्या कलावंतांनाही गेल्या तीन वर्षापासून वृद्धापकाळ मानधन मिळाले नसल्याने अभावग्रस्त वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध करण्यात आणि जतन करून ठेवण्यात खºया अर्थाने या राज्यातील लोककलावंतांचा सिंहाचा वाटा आहे. या कलावंतांनी आपले सबंध आयुष्य लोककलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यात घालविले. संगीत तमाशा, शाहिरी पोवाडे, लावण्या, प्रबोधनकार, देवीचा जागर, गोंधळ, डायका, भारुड, नकलाकार, भजन मंडळ, कीर्तनकार, गीत गायक, नृत्य करणारे व विविध वाद्य वाजविण्यात निपुण कलावंत व साहित्यिकांनी या कलांना वाढविले आणि पुरोगामी चळवळीला जिवंत ठेवले. उमेदीचा काळ त्यांनी या सेवेत वाहिला. त्यांच्या उदरभरणाचे साधनही हेच होते. बहुतेक कलावंत शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असल्याने रोजमजुरी व कामधंदा मिळणे कठीण असते. अशात समाज व कुटुंबाकडून होणारी उपेक्षा व शासनाकडून होणाºया दुर्लक्षामुळे वृद्धावस्थेत त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागते.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने नियमानुसार २०१७-१८ साली ६० कलावंतांची यादी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाला पाठविली व ती मंजूरही करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत या निवड झालेल्या कलावंतांचे मानधन जमा झाले नाही. एवढेच नाही तर २०१५-१६ पासूनच कलावंतांच्या खात्यात मानधन जमा झाले नसल्याची माहिती निवड झालेल्या कलावंतांनी लोकमतला दिली आहे. यानुसार गेल्या तीन वर्षापासून हे सर्व लोककलावंत मानधनापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षाला मानधनासाठी आलेले लोककलावंतांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. निवड समितीचे सदस्य दयाल कांबळे यांनी सांगितले, थकीत मानधनासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला वारंवार विचारणा केली आहे. मात्र शासनाकडून पैसा न आल्याची सबब त्यांच्याकडून दिली जाते. दुसरीकडे सांस्कृतिक संचालनालयालाही याबाबत निवेदन सादर केले असता त्यांच्याद्वारे पैसा नसल्याचे कारण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेंतर्गत कलावंतांना दर्जानुसार मानधन दिले जाते. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या कलावंताला ‘अ’ दर्जा देऊन २१०० रुपये मानधन आहे.
राज्य व जिल्हा पातळीवरील ब व क विभागाच्या कलावंतांना अनुक्रमे १८०० व १५०० रुपये दरमाह मानधन देण्याची योजना आहे. नागपूर जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी ४०० ते ५०० कलावंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करतात. मात्र शासन निर्णयानुसार त्यातील केवळ ६० कलावंतांची निवड केली जाते. ते तुटपुंजे असले तरी औषधपाणी व इतर खर्च निघून जातो. मात्र हेच मानधन थकीत झाल्याने या वृद्ध कलावंतांना अगतिकता सहन करावी लागत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

समिती सदस्यांचा बैठक भत्ताही थकला
२०१५-१६ पासून मानधन निवड समितीच्या सदस्यांचा बैठक भत्ताही थकित असल्याची माहिती समिती सदस्य दयाल कांबळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या बांधकाम, कृषी, समाज कल्याण आदी समित्यांप्रमाणे लोककलावंतांच्याही समितीला प्रवास भत्ता व बैठक भत्ता लागू आहे. मात्र सदस्यांना आजपर्यंत त्याचा लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Folk artists do not have 'wealth'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार