१०० टक्के लसीकरण व कोरोना प्रोटोकॉल पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:23+5:302021-06-09T04:11:23+5:30
नागपूर : पावसाळ्याच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढणार नाही, १०० टक्के लसीकरण होईल, यासाठी जिल्हाधिकारी ...
नागपूर : पावसाळ्याच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढणार नाही, १०० टक्के लसीकरण होईल, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी एकाच दिवशी आठ नगर परिषदेला भेट देऊन आढावा घेतला.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, वानाडोंगरी, वाडी, सावनेर, खापा, मोहपा, कळमेश्वर नगर परिषदेला त्यांनी भेट दिली. भेटीदरम्यान मान्सूनपूर्व तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंधित करण्यासाठी नगरपालिकेच्या नियोजनाची माहिती घेतली. सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने त्यांनी लसीकरणावर भर दिला. कोरोना प्रतिबंधासाठी १०० टक्के उपाय म्हणजे सर्व नागरिकांचे लसीकरण आहे. त्यासाठी योग्य उपाययोजना करा, सर्व नागरिक लसीकरण केंद्रावर पोहोचतील व सर्वांचे लसीकरण होईल, यासाठी नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
त्याचबरोबर बाजारपेठेतील गर्दी, मंगल कार्यालय, रिसॉर्ट, हॉटेल्स या ठिकाणी जमणारी गर्दी व त्या ठिकाणी शासकीय नियमांची पायमल्ली होणार नाही, याबाबतची यंत्रणा आणखी सक्षम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पावसाळ्यापूर्वीच्या कामावर त्यांनी लक्ष वेधले. आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्मिती व जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी अधिक सुलभ संपर्क व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यातील सर्व गावामधील आरोग्य व्यवस्थेच्या आढाव्यासाठी ५२ अधिकाऱ्यांची चमू कार्यान्वित केली होती.