प्रशासन व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करा : भय्याजी जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 10:29 PM2020-04-02T22:29:49+5:302020-04-02T22:31:28+5:30
वैश्विक संकटामुळे कोणी भयग्रस्त आहे तर कुठे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा वातावरणात प्रशासन व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करुनच सर्व लोक संकटातून मुक्त होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा रामनवमीच्या मुहूर्तावर संपूर्ण देश एका वेगळ्या स्थितीत आहे. या वैश्विक संकटामुळे कोणी भयग्रस्त आहे तर कुठे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा वातावरणात प्रशासन व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करुनच सर्व लोक संकटातून मुक्त होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. रामनवमीनिमित्त त्यांनी गुरुवारी स्वयंसेवकांना उद्देशून संदेश प्रसारित केला.
देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा संघानेदेखील मदतकार्यात सहभाग घेतला. ‘कोरोना’ संकटातदेखील १ लाखाहून अधिक स्वयंसेवक देशभरातील १० हजार गावांमध्ये पोहोचून सेवा कार्य करत आहेत. आतापर्यंत १० लाख कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली आहे. यात भोजन, शिधासामग्री पोहोचविणे, आरोग्य सेवेत सहकार्य करणे, जनजागृती करणे इत्यादींचा समावेश आहे, असे भय्याजी जोशी यांनी सांगितले. पुढील दोन आठवडे शासन व आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले तर निश्चितच आपण सर्व परत एकदा सामान्य आयुष्य जगण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू. त्यासाठी सर्वांनी सर्व प्रकारचे नियम व बंधनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भटक्यांसाठी सरसावले स्वयंसेवक
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भटक्या जमातींचे लोक विविध वस्त्यांत राहतात. ‘कोरोना’ संकटामुळे तेदेखील अडचणीत आले आहेत. संघ स्वयंसेवक त्यांच्यापर्यंत पोहोचून अन्नपाणी व आरोग्य सेवेची व्यवस्था करत आहेत. तसेच रक्तदानासाठीदेखील स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे. आपात्कालीन व्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिकांसाठीदेखील स्वयंसेवक भोजन व अल्पोपाहाराची व्यवस्था करत आहेत.
समाजाला जागृत करा
भगवान रामाचे स्मरण करून या संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्ती मिळेल. पुढील दोन आठवडे सर्वांनीच संकल्प घेऊन घरी राहावे. यासोबतच विविध माध्यमांतून समाजाला जागृत करण्यावरदेखील भर द्यावा. रामनवमीचा मुहूर्त समाजाचे संरक्षण, सेवा व जागृतीचा संदेश सर्वांना देत आहे. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असेदेखील भय्याजी जोशी म्हणाले.