काेराेना संक्रमण टाळण्यासाठी उपाययाेजनांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:02+5:302021-01-02T04:09:02+5:30
कळमेश्वर : चालू वर्ष संपले असून, नवीन वर्ष सुरू हाेणार असल्याने सरत्या वर्षाला निराेप देणे व नवीन वर्षाचे स्वागत ...
कळमेश्वर : चालू वर्ष संपले असून, नवीन वर्ष सुरू हाेणार असल्याने सरत्या वर्षाला निराेप देणे व नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. सरत्या वर्षात काेराेनाने आपल्याला जगण्यासाठी संघर्ष करणे शिकवले आहे. त्यामुळे नवीन वर्षात काेराेना संक्रमण शून्यावर आणण्यासाठी प्रत्येकाने शासनाने जाहीर केलेल्या उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन कळमेश्वरचे ठाणेदार आसिफराजा शेख यांनी पाेलीस ठाण्यात आयाेजित कार्यक्रमात केले.
यावेळी त्यांनी काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या उपाययाेजनांची व त्यांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती दिली. पाच दिवसांपासून कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री ११ वाजतानंतर २४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. एका ठिकाणी चारपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. कारण, शासनाने केवळ चार व्यक्तींनाच एकत्र येण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना ही बंधने लागू नाहीत. संवेदनशील ठिकाणी नियंत्रणाकरिता पाेलिसांची विशेष पथके तैनात केली आहेत. शिवाय, चार ठिकाणी नाकाबंदी करून वाहने व वाहनचालकांची तपासणी केली जात असल्याचेही ठाणेदार आसिफराजा शेख यांनी स्पष्ट केले.