विद्युत सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळा
By Admin | Published: January 21, 2016 02:47 AM2016-01-21T02:47:23+5:302016-01-21T02:47:23+5:30
राज्यातील विजेचे अपघात टाळण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करा आणि विद्युत सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळा, ...
विद्युत सुरक्षा जागरूकता सप्ताहाचा समारोप : नितीन गडकरी यांचे आवाहन
नागपूर : राज्यातील विजेचे अपघात टाळण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करा आणि विद्युत सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
विद्युत सुरक्षेसंबंधी जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासनतर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. चिटणवीस सेंटर येथे विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तसेच प्रधान सचिव (ऊर्जा) मुकेश खुल्लर, मुख्य विद्युत निरीक्षक सुहास बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
समारोप समारंभाच्या प्रथम सत्रात व्हीएनआयटीच्या विद्युत अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. भिडे, अंबुजा सिमेंटचे सचिन देशमुख, रामदेवबाबा कॉलेज आॅफ इंजिनियरिंगचे सहयोगी प्राध्यापक धनंजय तुतकरणे, चाचणी विभाग महावितरणचे कार्यकारी अभियंता मनीष वाठ इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्युत सुरक्षा स्मरणिका-२०१६ चे प्रकाशन करण्यात आले. स्वकार्यक्षेत्रात विद्युत अपघाताची संख्या निरंक असणाऱ्या वीज तंत्रज्ञ यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान विदर्भ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, महावितरण, एसएनडीएल, टाटा पॉवर, रिलायन्स, द एलिव्हेटर अॅन्ड एस्केलेटर कंपनी, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या यांना मुख्य विद्युत निरीक्षक सुहास बागडे, अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे, नलावडे यांच्या हस्ते मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य अभियंता रेशमे, भादीकर, उपाध्यक्ष तूरकर व महावितरण, एसएनडीएल, एनएमसीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)